Mahayuti | राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे आमदार किशोर पाटील (Kishaor patil) यांनी थेट स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करत भाजपवर (BJP) गद्दारीचे आरोप केले आहेत. या वक्तव्यामुळे महायुतीच्या स्थैर्याबद्दल मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
महायुतीत तणावाची नवी ठिणगी :
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगाव (Pachora- Bhadgoan) मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी नुकत्याच केलेल्या घोषणेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. “शिवसेना आता स्वबळावरच निवडणूक लढणार,” असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे महायुतीच्या एकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भाजपवर आरोप करताना ते म्हणाले की, “दोन टर्मपासून विरोधक गुपचूप उमेदवार देत मला पराभूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जनता आणि शिवसैनिक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.”
किशोर पाटील यांनी भाजपवर थेट निशाणा साधत म्हटले, “भाजपचे काही नेते पाठीत खंजीर खुपसणार असतील, तर अशा लोकांसोबत राहण्यापेक्षा थेट समोरासमोर लढलेलं बरं.” त्यांच्या या विधानामुळे जळगाव जिल्ह्यात महायुतीत मीठाचा पहिला खडा पडल्याचं म्हटलं जात आहे. अनेक नेत्यांनी मात्र या वक्तव्यावर अद्याप भाष्य करण्यास टाळाटाळ केली आहे.
Mahayuti | नवीन उमेदवारी जाहीर, राजकीय समीकरणात बदल :
किशोर पाटील (Kishor Patil) यांनी भडगाव नगरपालिकेसाठी रेखा मालचे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर पाचोरा नगरपालिकेसाठीची उमेदवारी 1 नोव्हेंबर रोजी जनतेच्या कौलावरून जाहीर केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या निर्णयामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून, स्थानिक स्तरावर नवे समीकरण निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
राज्यातील इतर भागांत महायुतीचे नेते एकत्र निवडणुकीची तयारी करत असताना, शिंदे गटाच्या आमदाराची ही भूमिका चिंतेचा विषय ठरत आहे. आगामी निवडणुकांपूर्वीच शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेला हा तणाव पुढे ‘महायुती फुटी’चं रूप घेईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






