Sharad Pawar | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी बारामती येथे विमान लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी सुमारे पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरात शोककळा पसरली असून पवार कुटुंबावरही मोठा आघात झाला आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनाची माहिती शरद पवार (Sharad Pawar) यांना तात्काळ देण्यात आली नव्हती. त्यांच्या प्रकृतीचा विचार करता त्यांना अचानक धक्का बसू नये म्हणून कुटुंबीय आणि निकटवर्तीयांनी आधीच काळजी घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच ही दुःखद बातमी देण्यापूर्वी शरद पवार यांना ब्रीज कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
ब्रीज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दिली गेली दुःखद बातमी :
शरद पवार (Sharad Pawar) यांना सर्वात आधी ब्रीज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital Update) नेण्यात आलं, तिथे डॉक्टरांच्या उपस्थितीत त्यांना अजित पवार यांच्या निधनाची माहिती देण्यात आली. त्यांना हा धक्का सहन होईल की नाही, याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळेच ही खबर अत्यंत संवेदनशील पद्धतीने देण्यात आली असल्याचं समजतंय. सध्या शरद पवार पुन्हा त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी परतले असून दुपारी ते बारामतीकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर पवार कुटुंबीयांसह पक्ष नेते आणि कार्यकर्तेही भावूक झाले असून सर्वत्र शोकाचं वातावरण आहे. अजित पवार यांच्याशी अनेक दशकांपासून राजकीय आणि कौटुंबिक नातं असलेल्या शरद पवार यांच्यासाठी हा क्षण अत्यंत वेदनादायी ठरत आहे.
Sharad Pawar | अपघाताचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू :
दरम्यान, या अपघाताचं नेमकं कारण काय, याचा तपास सुरू असून तांत्रिक बिघाड, हवामान स्थिती किंवा अन्य कारणांचा सखोल अभ्यास केला जात आहे. ब्लॅक बॉक्स हाती आल्यानंतरच अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होणार असल्याचं तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे.
आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar Death) यांच्या बारामतीत चार सभा नियोजित होत्या. त्यासाठीच ते सकाळी मुंबईहून बारामतीसाठी निघाले होते. मात्र लँडिंगदरम्यान विमानाला अपघात झाल्याने अजित पवार यांच्यासह विमानातील अन्य सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून जनतेमध्ये तीव्र शोकभावना व्यक्त होत आहेत.






