Sharad Pawar | महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. आगामी 15 जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. सोलापुरातून समोर आलेल्या या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सोलापूर महापालिकेतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन माजी महापौरांनी थेट राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेला हा पक्षप्रवेश शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
सोलापुरात राजकीय भूकंप; दोन माजी महापौरांनी बदलला पक्ष :
मिळालेल्या माहितीनुसार, माजी महापौर यू. एन. बेरिया आणि माजी महापौर नलिनी चंदेले यांनी आज अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या दोघांसोबतच काही इतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाची पकड मजबूत मानली जात होती. मात्र, दोन माजी महापौरांनी अचानक पक्ष सोडल्यामुळे या गटाची मोठी राजकीय कोंडी झाल्याचं चित्र आहे. (Sharad Pawar News)
Sharad Pawar | युतीची चर्चा सुरू असतानाच धक्का :
एकीकडे राज्यभरात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात युतीबाबत चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे असा पक्षप्रवेश झाल्यामुळे शरद पवार गटातील अस्वस्थता वाढली आहे. विशेष म्हणजे, ज्या वेळी महापालिका निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आहे, त्याच वेळी घडलेली ही घटना राजकीय समीकरणे बदलणारी ठरू शकते.
राज्यात अनेक ठिकाणी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही शहरांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचे निर्णयही घेतले गेले आहेत. मात्र, सोलापुरातील हा पक्षप्रवेश अजित पवार गटासाठी मोठी ताकद ठरण्याची चिन्हे आहेत.
महापालिका निवडणुकीवर काय परिणाम होणार? :
दोन माजी महापौरांच्या प्रवेशामुळे सोलापुरातील राजकीय गणिते बदलू शकतात. याचा थेट परिणाम मतदारांवर होण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाला नव्या रणनीती आखाव्या लागणार आहेत. तर अजित पवार गटासाठी हा प्रवेश मोठा बूस्टर मानला जात आहे.
आगामी काळात अजून कोणते नेते पक्षांतर करणार? आणि युतीबाबत अंतिम निर्णय काय होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.






