Sharad Pawar | ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी दावा केला की, विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दिल्लीत त्यांना दोन अज्ञात व्यक्ती भेटल्या होत्या, ज्यांनी त्यांना १६० जागा निवडून देण्याची ऑफर दिली होती. त्यांच्या या दाव्यानंतर राजकारणात पुन्हा एकदा नवे वळण येणार असल्याचे दिसत आहे.
शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
शरद पवार म्हणाले की, “विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी मी दिल्लीत असताना दोन लोक मला भेटायला आले होते. त्यांची नावे आणि पत्ते मला माहिती नाहीत. त्यांनी मला सांगितलं की, महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. आम्ही तुम्हाला विधानसभेच्या १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी देतो.” शरद पवारांनी असेही म्हटले की, निवडणूक आयोगाबाबत त्यांच्या मनात यत्किंचितही शंका नव्हती, त्यामुळे त्यांनी या लोकांकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांनी त्या लोकांना खासदार राहुल गांधी यांची भेट घालून दिली. राहुल गांधी आणि मी, आपण या गोष्टींकडे लक्ष न देता लोकांकडे जाऊन त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा निर्णय घेतला, असे पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांच्या या दाव्यानंतर, त्यांना आणि राहुल गांधींना भेटणाऱ्या त्या दोन व्यक्ती कोण होत्या, त्यांचा निवडणूक आयोग किंवा मतदान प्रक्रियेशी काय संबंध होता, असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. याआधी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर काही गंभीर आरोप केले होते. त्यांच्या आरोपांनंतर शरद पवारांच्या या दाव्याने राज्याच्या राजकारणात नवा स्फोट झाल्याचे दिसत आहे.
“दोन अज्ञात व्यक्ती भेटल्या होत्या”
याच पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राहुल गांधींच्या आरोपांवरही भाष्य केले. राहुल गांधींच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. पण आयोगाने राहुल गांधींकडे शपथपत्र मागणे चुकीचे आहे. निवडणूक आयोगावर आरोप झाले आहेत, तर त्याचे उत्तरही आयोगाकडूनच मिळाले पाहिजे, भाजपाकडून नको, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही शरद पवार यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. त्यांच्या मते, दोन व्यक्तींनी पवार साहेबांकडे येऊन मतदार यादीत फेरफार करण्याची ऑफर दिली होती, मात्र पवार साहेबांनी ती धुडकावून लावली.






