Phaltan Doctor Death case | सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटण (Phaltan) येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने राज्य हादरले आहे. या प्रकरणी प्रशांत बनकर (Prashant Bankar) याला अटक झाली असून, पोलीस निरीक्षक गोपाळ बदने (Gopal Badne) फरार आहे. आता या प्रकरणातील वादाचे मूळ समोर येत असून, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
फिटनेस प्रमाणपत्रावरून पेटला होता वाद
या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलीस अधिकारी तुषार दोशी (Tushar Doshi) यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मृत महिला डॉक्टर आणि फलटण ग्रामीण पोलिसांमध्ये (Phaltan Rural Police) वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्रावरून अनेकदा वाद झाले होते. पोलिसांनी आरोपींना दिलेला वैद्यकीय अहवाल हवा तसा मिळत नसल्याने डॉक्टरला त्रास दिला जात असल्याचा आरोप होता. या संदर्भात डॉक्टरने पोलिसांविरोधात तक्रारही केली होती.
या तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाने चौकशी करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आदेश दिले होते, असेही दोशी यांनी स्पष्ट केले. मात्र, हा वाद मिटण्याऐवजी वाढतच गेल्याचे आणि त्याचे पर्यवसान आत्महत्येत झाल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी जिल्हा आरोग्य विभागाकडे डॉक्टर विरोधात तक्रार केल्याने चौकशी समितीही नेमण्यात आली होती, जिथे डॉक्टरने आपली लेखी बाजू मांडली होती.
Phaltan Doctor Death case | तपास सुरू
पोलीस अधिकारी तुषार दोशी यांनी सांगितले की, या आत्महत्येमागे कोणी तिला प्रवृत्त केले का, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपी प्रशांत बनकरला अटक झाली असून, फरार निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याचा शोध घेण्यासाठी चार पथके कार्यरत आहेत. लवकरच त्यालाही अटक केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मृत डॉक्टरने आरोग्य प्रशासनाला लिहिलेल्या एका पत्रात ‘खासदार’ शब्दाचा उल्लेख असल्याबद्दल विचारले असता, दोशी यांनी स्पष्ट केले की, तो विषय पूर्णपणे वेगळा आहे. खासदारांचे नाव जिल्हा शल्यचिकित्सकांना लिहिलेल्या पत्रात असून, सध्याच्या गुन्ह्याशी त्याचा कोणताही संबंध दिसत नाही. तपासाअंतीच सत्य बाहेर येईल, असेही त्यांनी नमूद केले.






