Satara Doctor Case News | फलटण येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे (Sampada Munde) यांच्या आत्महत्या प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर या घटनेला नवे वळण मिळाले आहे. कामात अत्यंत कुशल आणि जबाबदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संपदा मुंडे यांनी आपल्या हातावर आत्महत्येपूर्वी एक नोट लिहिली होती, ज्यात काही व्यक्तींवर गंभीर आरोप केले होते.
शवविच्छेदन अहवालात उघडले रात्री दीडच्या सुमारास घडलेले वास्तव :
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. संपदा मुंडे यांनी रात्री दीडच्या सुमारास आत्महत्या केली, असे शवविच्छेदन अहवालात नमूद आहे. सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांनी प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्याची पुष्टी केली असून, पुढील तपास या अहवालानुसार केला जाईल, असे सांगितले आहे.
दरम्यान, कालपर्यंत अनेकांनी ही घटना आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र, प्राथमिक पोस्टमॉर्टेम अहवालात हत्या किंवा जबरदस्तीचे कोणतेही संकेत आढळले नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Satara Doctor Case News | पीएसआय आणि आरोपींच्या नावांचा उल्लेख, राजकीय वाद निर्माण :
डॉ. संपदा मुंडे (Sampada Munde) यांनी आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलेल्या नोटमध्ये पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांची नावे स्पष्टपणे लिहिली होती. नोटमध्ये त्यांनी आरोपी पीएसआयने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा, तसेच प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला होता.
या प्रकरणाला आता राजकीय रंग चढू लागला आहे. कारण, यादरम्यान रणजीत निंबाळकर (Ranjit Nimbalkar) आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या नावांचा देखील उल्लेख करण्यात आला. त्यामुळे फलटणपासून साताऱ्यापर्यंत राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
संपदा मुंडे या अत्यंत मेहनती आणि हुशार डॉक्टर म्हणून ओळखल्या जात होत्या. त्या 24 तास ड्युटी करून 24 तास अभ्यासासाठी वेळ देत असत. त्यांच्या आत्महत्येने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला धक्का बसला आहे. फलटण शहरात भाड्याने राहत असतानाही त्यांनी आत्महत्या करण्यासाठी शहरातील एका हॉटेलची दोन दिवसांसाठी बुकिंग केली होती. यादरम्यान त्या नियमित रुग्णालयात ड्युटीवरही जात होत्या, अशी माहिती समोर आली आहे.
या प्रकरणातील प्रत्येक नवीन खुलास्यानंतर संपदा मुंडे यांचा मृत्यू फक्त एक आत्महत्या नाही का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांनी सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करून सखोल तपास सुरू केला आहे.






