Satara Doctor Death Case | सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाला आता नवे धक्कादायक वळण मिळाले आहे. गुरुवारी रात्री या डॉक्टरने एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. मात्र, आता मृत डॉक्टरच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांमुळे तपास अधिकच गंभीर स्वरूपात गेला आहे. महिला डॉक्टरच्या आतेभावाने असा आरोप केला आहे की, आत्महत्येपूर्वी तिला फोन करणारे फलटण भागातील खासदार होते.
डॉ. संपदा मुंडे असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव असून, त्या फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होत्या. भाऊबीजेच्या दिवशी, रात्री साडे दहाच्या सुमारास त्यांनी फलटणमधील एका हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन जीवन संपवलं. या घटनेनंतर पोलिसांनी आत्महत्येची नोंद घेतली असली, तरी नातेवाईकांकडून करण्यात आलेले आरोप या प्रकरणाला धक्कादायक वळण देत आहेत.
पोस्टमार्टम अहवाल बदलण्यासाठी दबाव असल्याचा आरोप
महिला डॉक्टरच्या काकांच्या म्हणण्यानुसार, पुतणीवर शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव टाकला जात होता. या दबावामुळे ती मानसिक तणावाखाली होती. “तणावामुळे माझं आयुष्य संपवावं लागेल,” असं ती वारंवार आपल्या नातेवाईकांना सांगत होती, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे. या दडपणामुळेच तिने अखेर आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.
दरम्यान, महिला डॉक्टरच्या आतेभावाने आणखी गंभीर आरोप केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, “आमच्या बहिणीला फोन करणारे फलटण भागातील खासदार होते. खासदारांच्या पीएने फोन लावून दिला आणि त्यानंतर बहिणीने खासदारांशी संवाद साधला.” त्याने असेही म्हटले की, “बहिणीवर काही महिन्यांपासून दबाव होता आणि तिने दोन-तीन महिन्यांपूर्वी तक्रारही केली होती, परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.”
Satara Doctor Death Case | सुसाईड नोटमध्ये बलात्कार आणि छळाचे आरोप
या प्रकरणात सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे महिला डॉक्टरच्या तळहातावर आढळलेली सुसाईड नोट. त्या सुसाईड नोटमध्ये तिने पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा, तर प्रशांत बनकर याच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणाची गंभीर दखल घेत सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांनी संबंधित आरोपींवर तत्काळ निलंबन आणि कठोर कारवाईचे आदेश दिले असून, आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.






