Satara Doctor Death Case | सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रूग्णालयात महिला डॉक्टरच्या आत्महत्येने संपूर्ण राज्याला हादरवून टाकले आहे. या प्रकरणात महिला डॉक्टरवर एका पोलीस उपनिरीक्षकाने वारंवार बलात्कार केल्याचे आणि पोस्टमॉर्टम अहवाल बदलण्यासाठी वरिष्ठांकडून दबाव टाकण्यात आल्याचे उघड झाले आहे. सुसाईड नोटमध्येही याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून त्यामुळे या घटनेने भीषण वळण घेतले आहे. (Satara Doctor Death Case)
पीडित महिला डॉक्टर मूळची बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील होती. तिच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण गावात शोककळा पसरली. गावातील लोकांच्या डोळ्यात अश्रू आणि राग दोन्ही दिसून येत होते. पीडितेच्या कुटुंबीयांनी थेट मागणी केली आहे की, “आमची मुलगी गेली, पण दोषींना आता फाशी द्या,” असा आवाज गावभर घुमला आहे.
दबाव, ताण आणि दुःखद शेवट :
सातत्याने वरिष्ठांकडून खोटी साक्ष द्यावी, त्यांच्याच बाजूने काम करावं असा दबाव पीडित महिला डॉक्टरवर आणला जात होता. मानसिक त्रासामुळे ती दिवसेंदिवस खचत चालली होती, आणि अखेरीस तिने टोकाचं पाऊल उचललं. दिवाळीत सुट्ट्या नसल्याने ती पुढच्या आठवड्यात गावी जाणार होती, मात्र त्या आधीच तिचा मृत्यू झाला. (Satara Doctor Death Case)
गावातील लोक म्हणतात, “ती खूप अभ्यासू होती, आपल्या मेहनतीने डॉक्टर बनली होती. पण अन्यायाविरुद्ध उभी राहिली म्हणून तिला प्राण गमवावे लागले.” तिच्या मृत्यूने ग्रामस्थांसह सर्व समाजवर्गात प्रचंड संताप आहे.
Satara Doctor Death Case | नेमकं प्रकरण काय? :
फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या या डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट सापडली आहे. या नोटमध्ये तिने थेट पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच प्रशांत बनकर नावाच्या व्यक्तीनेही मानसिक त्रास दिल्याचे नमूद केले आहे.
ही घटना काही महिन्यांपासून सुरू असलेल्या आरोग्य विभाग आणि पोलिसांमधील वादाशी संबंधित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. डॉक्टरने आपल्या वरिष्ठांना आणि नातेवाईकांना या त्रासाबद्दल वारंवार सांगितले होते, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही, असे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
PSI गोपाळ बदने निलंबित, मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश :
या प्रकरणाची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून संपूर्ण माहिती घेतली. त्यांनी आरोपी पोलीस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याचे आणि कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पीएसआय गोपाळ बदने यांचे तात्काळ निलंबन करण्यात आले असून चौकशी जलदगतीने सुरू आहे.
दरम्यान, बीडमधील ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी दोषींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे. “जर दोषी सुटले तर आमचं न्यायव्यवस्थेवरचं विश्वास उरेल का?” असा सवाल कुटुंबीयांनी केला आहे.






