Satara Doctor Death | फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टरच्या (Dr. Sampada Munde) हॉटेलमधील आत्महत्येने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील ‘त्या’ रात्रीचा आणि त्यानंतरच्या १७ तासांच्या गूढ घटनाक्रमाची माहिती आता समोर आली आहे. या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापनाने बुधवारी पोलिसांना माहिती दिली.
‘फक्त एक रात्र राहायचंय’: रुम नं ११४ मध्ये चेक-इन
घटनेच्या रात्री, म्हणजेच मंगळवारी (२३ ऑक्टोबर) रात्री ९ वाजून ३२ मिनिटांनी मृत डॉक्टर त्यांच्या कारने हॉटेलच्या गेटवर पोहोचल्या. सुरुवातीला सुरक्षारक्षकाने त्यांना “रूम नाही” असे सांगितले, मात्र डॉक्टरांनी “मला फक्त एक रात्र राहायचे आहे,” अशी विनंती केली. त्यानंतर रक्षकाने हॉटेलमध्ये विचारपूस करून त्यांना आत सोडले.
पुढील तीन मिनिटांत त्या रिसेप्शनवर पोहोचल्या, तिथे त्यांनी आपले आधार कार्ड (Aadhaar Card) देऊन सर्व औपचारिकता पूर्ण केल्या. “मी सकाळी साडेनऊ वाजता चेक-आउट करेन,” असे त्यांनी रिसेप्शनवर सांगितले. रात्री ९ वाजून ३९ मिनिटांनी त्यांना हॉटेलमधील रुम क्रमांक ११४ देण्यात आला. मात्र, त्यानंतर त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
Satara Doctor Death | १७ तासांचे गूढ आणि उघडलेले दार
दुसऱ्या दिवशी, बुधवारी, सकाळ उलटून गेली तरी रुम क्रमांक ११४ मधून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तब्बल १७ तास उलटल्यानंतर, दुपारी १ वाजून १९ मिनिटांनी हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता, डॉक्टरने पंख्याला गळफास घेतल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले.
या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. शिवसेना (UBT) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी हा हत्येचा कट असल्याचा आरोप करत, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjeetsinh Naik-Nimbalkar) यांचा फोटो दाखवत बदनामीचा प्रयत्न केल्याचा दावा हॉटेल मालक दिलीपसिंह भोसले (Dilip Singh Bhonsle) यांनी केला आहे. भोसले यांनी ही आत्महत्याच असून, बदनामीसाठी हत्येचा बनाव रचला जात असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्यामार्फत मृत डॉक्टरच्या बीड (Beed) येथील बहिणीशी फोनवरून १५ मिनिटे संवाद साधला आणि कुटुंबाला पाठिंबा दिला.






