Santosh Nalawade | मराठी मालिकाविश्वासाठी एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. ‘अप्पी आमची कलेक्टर’ (Appi Amchi Collector) फेम टीव्ही अभिनेता संतोष हणमंत नलावडे (Santosh Hanmant Nalawade) यांचे अवघ्या 49 व्या वर्षी अपघाती निधन झाले आहे. नांदेड येथे झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
अपघात कसा झाला?
संतोष नलावडे (Santosh Nalawade) हे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्ड विभागात कार्यरत होते. ते नांदेडमध्ये विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी गेले होते. मात्र, तिथेच एका अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबासह मराठी मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर मूळ गाव वाढे (ता. सातारा) येथे अंत्यसंस्कार पार पडले.
अभिनय क्षेत्रातील योगदान
संतोष नलावडे (Santosh Nalawade) यांनी हौशी नाटकांमधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘शेतकरी नवरा हवा’, ‘लाखात एक आमचा दादा’, ‘मन झालं बाजींद’, ‘कॉन्स्टेबल मंजू’ आणि ‘लागीर झालं जी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. तसेच, त्यांनी विविध मराठी चित्रपटांमध्येही सहकलाकार म्हणून उत्तम अभिनय केला.
कलाविश्वात शोककळा
संतोष नलावडे यांच्या अकाली निधनाने संपूर्ण मराठी मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव आणि उत्कृष्ट अभिनय यामुळे ते कायमच प्रेक्षकांच्या आठवणीत राहतील.






