Santosh Deshmukh Murder Case | बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे. या बहुचर्चित प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (walmik karad) याचा मावसभाऊ असलेल्या विष्णू चाटे (Vishnu Chate) याचा जामीन अर्ज बीड येथील जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. आरोपीस जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाव टाकला जाऊ शकतो तसेच महत्त्वाच्या पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता आहे, असे स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. या निर्णयामुळे देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या विशेष मकोका न्यायालयात सुरू असून, या प्रकरणात सर्व आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावर बचाव पक्षाने जोरदार युक्तिवाद केला होता. मात्र सरकारी वकिलांनी आरोपीच्या भूमिकेकडे लक्ष वेधत, त्याचा गुन्ह्यातील सक्रिय सहभाग, साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची शक्यता आणि पुरावे नष्ट करण्याचा धोका याबाबत न्यायालयासमोर ठोस भूमिका मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने विष्णू चाटे याचा जामीन अर्ज फेटाळण्याचा निर्णय दिला.
जामीन दिल्यास पुरावे धोक्यात, न्यायालयाचे स्पष्ट निरीक्षण :
न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे की, आरोपीला जामीन दिल्यास या संवेदनशील प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या महत्त्वाच्या पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते, असा गंभीर धोका असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले आहे. त्यामुळे समाजहित आणि तपासाची विश्वासार्हता लक्षात घेता आरोपीला जामीन देणे योग्य ठरणार नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.
या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज यापूर्वीच बीड येथील न्यायालयाने तसेच उच्च न्यायालयानेही फेटाळलेला आहे. विष्णू चाटे हा वाल्मिक कराड याचा मावसभाऊ असल्याने, दोघांमधील संबंध आणि गुन्ह्याच्या वेळी झालेला संवाद तपास यंत्रणेसाठी महत्त्वाचा ठरतो आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख यांच्या अपहरणाच्या वेळी धनंजय देशमुख यांच्याशी विष्णू चाटेचा सतत फोनवर संपर्क होता.
Santosh Deshmukh Murder Case | अपहरणावेळी 35 फोन, ‘15 मिनिटांत सोडतो’ असे आश्वासन :
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्यानंतर धनंजय देशमुख आणि विष्णू चाटे यांच्यात जवळपास 35 वेळा फोनवर संवाद झाला होता. या संभाषणांदरम्यान चाटेने “15 मिनिटांत सोडतो” असे सांगत वेळकाढूपणा केल्याचा आरोप आहे. मात्र त्यानंतर संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली आणि घटनेनंतर विष्णू चाटे फोन बंद करून फरार झाला होता. या सर्व बाबी तपासाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानल्या जात आहेत.
सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुरू असून आतापर्यंत 23 सुनावण्या झाल्या आहेत. मागील सुनावणीत विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण झाला होता. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडीओ आरोपींच्या वकिलांना देण्यात आल्यानंतर आज सर्व आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
आरोपींवर गंभीर कलमांखाली आरोप, पुढील सुनावणी 8 जानेवारीला :
या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड (Walmik karad), विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे यांच्यासह फरार आरोपी कृष्णा आंधळे यांच्यावर दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. या सर्व आरोपींवर खंडणी, अपहरण, हत्या, पुरावे नष्ट करणे, कट रचना, संघटितपणे गुन्हेगारी कृत्य करणे, जातीवाचक शिवीगाळ तसेच कंपनीचे नुकसान अशा गंभीर स्वरूपाच्या कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. (Santosh Deshmukh Murder Case)
न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने देशमुख कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणाचा अंतिम निकाल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी होणार असून, तपास आणि साक्षीच्या आधारे पुढील टप्प्यात काय घडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






