Santosh Deshmukh | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने राज्यात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात आता शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, ही हत्या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसारच झाली आहे.
हत्या प्रकरणातील धक्कादायक पुरावे
पोलिस तपासात संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे १५ व्हिडिओ आणि ८ फोटो हस्तगत करण्यात आले आहेत. या माध्यमांतून दिसते की, देशमुख यांना तब्बल दोन तासांपर्यंत अमानुष मारहाण करण्यात आली. पहिला व्हिडिओ दुपारी ३:४६ वाजता तर शेवटचा ५:५३ वाजता चित्रीत करण्यात आला आहे. या काळात देशमुख यांना सातत्याने अत्याचार सहन करावे लागले.
आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांच्या जबाबांनुसार, सुग्रीव कराडच्या आदेशानुसार सुदर्शन घुलेला मारहाण करण्यात आली होती. तसेच, संतोष (Santosh Deshmukh) देशमुख यांनी घुलेला मारहाण केली होती. फरार आरोपी कृष्णा आंधळेने देखील सुग्रीव कराडचे नाव घेतले आहे. सुग्रीव कराड हा केज येथील रहिवासी असून, त्याच्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे.
राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप
अंबादास दानवे यांनी आरोप केला आहे की, संतोष देशमुख यांची हत्या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसारच झाली आहे. त्यांच्या मते, या दोघांच्या आदेशानुसारच ही क्रूर हत्या घडवण्यात आली. पोलिस तपासादरम्यान या आरोपांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
राजकीय रागातून सरपंची हत्या-
सुदर्शन घुलेच्या (Sudarshan Ghule) पोलिसांसमोर दिलेल्या कबुलीजबाबानुसार, वाल्मिक कराड (Valmik Karad) हा त्यांच्या समाजाचा नेता असून विष्णू चाटे (Vishnu Chate) हे राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे तालुका अध्यक्ष आहेत. स्वतः सुद्धा राष्ट्रवादीच्या गटाचा कार्यकर्ता असल्याचं घुलेनं सांगितलं. वाल्मिक कराडने सरपंचाला धडा शिकवायला सांगितल्यामुळेच त्यांनी संतोष देशमुख यांचे अपहरण केले.
अपहरण केल्यानंतर देशमुख यांना तब्बल दोन तास अमानुष मारहाण करण्यात आली. मारहाण सुरू असतानाच घुलेचा जयराम चाटेच्या फोनवरून विष्णू चाटेशी दोन-तीन वेळा संपर्क झाला. प्रतीक घुलेने (Pratik Ghule) धावत येत दोन्ही पायांनी देशमुख यांच्या छातीवर जोरात उडी मारली. त्यामुळे त्यांना रक्ताची उलटी झाली आणि ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना गाडीत टाकण्यात आले.






