“कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच, सरकारने…”; मस्साजोग गावकरी प्रचंड दहशतीत?

On: January 8, 2025 10:28 AM
sanjay raut tweet on walmik karad
---Advertisement---

Sanjay Raut | बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाबाबत रोज नवीन-नवीन खुलासे समोर येत आहेत. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्ये प्रकरणी आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात वाल्मिक कराड या हत्येचा मुख्य मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला जातोय. वाल्मिक कराड हा अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे मुंडे यांना विरोधकांनी टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. (Sanjay Raut )

या वाल्मिक कराडवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. बीडमध्ये त्याची प्रचंड दहशत असल्याचं म्हटलं जातंय. सध्या कराड हा खंडणी आणि हत्या प्रकरणात अटकेत आहे. त्याची चौकशी केली जातेय. त्यातच वाल्मिक कराडचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो देखील समोर येत आहेत. अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

संजय राऊत यांचं खळबळजनक ट्वीट

संजय राऊत यांनी वाल्मिक कराडचा एक नवा फोटो ट्वीट करत अत्यंत खळबळजनक दावा केलाय. संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट शेअर केले आहे. यात त्यांनी एक फोटो पोस्ट करत मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत, जनता अगतिक झाली आहे, असा दावा केला आहे.

राऊत (Sanjay Raut ) यांनी पोस्ट केलेल्या फोटोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संतोष देशमुख यांच्या खुनाचा आरोप असलेला वाल्मिक कराड एकाच फ्रेममध्ये दिसून येत आहे. तसेच वाल्मिक कराडच्या शेजारी धनंजय मुंडेही उभे असल्याचे दिसत आहे. या फोटोवर 21 ऑगस्ट 2024 असे लिहिल्याचे दिसून येतेय.

ट्वीटमध्ये नेमकं काय म्हटलंय?

या फोटोच्या कॅप्शनमध्ये राऊत यांनी लिहिलं की, “एका फ्रेममध्ये सगळे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास खरच होईल का? मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत. ग्रामस्थ म्हणतायेत ‘सरकारला जमत नसेल तर सरकारने गावाला लाकडं पाठवून द्यावी. आम्ही सगळे जळून घेतो.असंही कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच आहे’ अगतिक जनता.”,

सध्या संजय राऊतांनी (Sanjay Raut ) ट्वीट केलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तसेच त्यांनी केलेल्या दाव्याने देखील खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळात आता संजय राऊत यांचे हे ट्वीट चर्चेत आले आहे. त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

News Title – sanjay raut tweet on walmik karad

Join WhatsApp Group

Join Now