Sunjay Kapur Property Dispute | उद्योगपती संजय कपूर यांच्या अंदाजे 30 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरून सुरू असलेल्या वादात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. अभिनेत्री करिश्मा कपूर ( Karisma Kapoor) यांच्या मुलांनी या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या याचिकेमध्ये संजय कपूर यांच्या मृत्यूपत्रावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयात सुरू होती. करिश्मा कपूर यांच्या मुलांनी त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळावा, अशी मागणी करत मृत्यूपत्र बनावट असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणामुळे बॉलिवूड आणि उद्योगजगतात खळबळ उडाली आहे.
मृत्यूपत्रात छेडछाड झाल्याचा आरोप :
करिश्मा कपूर यांच्या मुलांचा दावा आहे की संजय कपूर (जिवंत असतानाच त्यांच्या मृत्यूपत्रात बदल करण्यात आले. सुनावणीदरम्यान वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला की संजय कपूर हे मुलांसोबत सुट्टीवर असताना मृत्यूपत्रात छेडछाड करण्यात आली होती. विशेष म्हणजे मृत्यूपत्रात सुधारणा करणाऱ्या व्यक्तीला संजय कपूर यांच्या मृत्यूच्या अवघ्या एक दिवसानंतर कंपनीचा संचालक बनवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याचिकेत संजय कपूर यांच्या तिसऱ्या पत्नी प्रिया सचदेव कपूर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. प्रिया कपूर यांनी बनावट मृत्यूपत्र तयार करून संजय कपूर यांची संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे. मुलांच्या मते, संजय कपूर यांनी त्यांना मालमत्तेत वाटा देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र मृत्यूपत्रात त्यांची नावेच नसल्याचे समोर आले.
Sunjay Kapur Property Dispute | दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा आदेश :
या प्रकरणात करिश्मा कपूर यांच्या मुलांच्या वकिलांनी मृत्यूपत्राची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र प्रिया कपूर यांच्या वकिलांनी या मागणीला विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे.
न्यायालयाने प्रिया सचदेव कपूर आणि मृत्यूपत्राची अंमलबजावणी करणाऱ्या संबंधित व्यक्तीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणातील अंतिम निर्णय न्यायालयाने सध्या राखून ठेवला असून पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Sanjay Kapur Property Dispute)
दरम्यान, संजय कपूर यांनी आयुष्यात तीन विवाह केले होते. दुसरे लग्न अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्याशी झाले असून या दोघांना समायरा आणि कियान ही दोन मुले आहेत. घटस्फोटानंतर संजय कपूर यांनी प्रिया सचदेव यांच्याशी विवाह केला होता. संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीवरून सुरू झालेला हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.






