Pune News | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर सध्या सडकून टीका केली जात असतानाच, त्यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या संगीता भालेराव यांनी एक नवीन आरोप केला आहे. रूपाली चाकणकर यांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचे संगीता भालेराव यांनी म्हटले आहे.
चाकणकरांच्या कार्यकर्त्यांकडून धमकीचे फोन
संगीता भालेराव यांनी स्पष्ट केले की, “एखाद्या व्यक्तीला कायद्याचं ज्ञान आहे, ज्या व्यक्तीला सामाजिक जाणीवांचं भान आहे, अशा व्यक्तीला महिला आयोगाचे अध्यक्षपद द्यायला हवं, या तळमळीच्या भूमिकेतून मी पोस्ट केली आहे.” त्यांनी रूपाली चाकणकर यांचा वैयक्तिक द्वेष करत नसल्याचे आणि कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट केलेली नसल्याचेही नमूद केले.
भालेराव यांनी पुढे म्हटले की, “त्यांच्याकडे त्यांच्या पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद आहे. त्या महिला आयोगाच्या अध्यक्षाही आहेत. याच कारणामुळे मी त्यांना सांगितलं की, त्यांनी महिला आयोगाचं पद सोडावं, एवढंच मी म्हटलं आहे.”
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राज्य महिला आयोगाने हलगर्जीपणा केल्याचा आरोप संगीता भालेराव यांनी केला आहे. “आज जर त्यांनी हगवणे यांच्या मोठ्या सुनेच्या तक्रारीची दखल घेतली असती, तर वैष्णवी जिवंत राहिली असती,” याच भावनेतून आपण ती पोस्ट केली असल्याचेही भालेराव यांनी म्हटले आहे.
Pune News | फेसबुक पोस्टमुळे धमकी
दरम्यान, संगीता भालेराव यांनी तक्रार दिल्यानंतर सांगितले की, त्यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टनंतर त्यांना चाकणकर यांच्या कार्यकर्त्यांचे फोन येत होते. चाकणकरांकडून माझ्या जीवितास धोका आहे. आपण कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट केलेली नसून, केवळ त्यांनी पदमुक्त व्हावे अशी मागणी केली होती, अशी माहिती भालेराव यांनी दिली. या आरोपामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावरील दबाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.






