Krushna Andhale l मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. तपासाची चक्रे वेगाने फिरत असली तरी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी खळबळजनक दावा केला आहे. “संतोष देशमुख प्रकरणातील चौथा आरोपी कृष्णा आंधळे (Krushna Andhale) हा जिवंत नसेल,” असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही, असेही ते म्हणाले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. 2023 मध्ये त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता, तरीही त्याला अटक झाली नव्हती. धक्कादायक बाब म्हणजे, मागील चार वर्षांत त्याच्यावर धारूर, आंबेजोगाई आणि केज पोलीस ठाण्यांमध्ये खंडणी, मारहाण आणि खुनाचा प्रयत्न यासारखे सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. (Santosh Deshmukh Case) एवढे गुन्हे करूनही तो मोकाट कसा फिरत होता? त्याला कोणी पाठीशी घालत होते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
संदीप क्षीरसागरांचा गंभीर आरोप :
“बीडमधील अनेक प्रकरणे आता समोर येऊ लागली आहेत. लोक स्वतःहून पुढे येऊन अन्यायाविरोधात बोलत आहेत. संतोष देशमुख प्रकरणातील चौथा आरोपी कृष्णा आंधळे जिवंत नसेल असा मला संशय आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही,” असे संदीप क्षीरसागर म्हणाले. त्यांनी कृष्णा आंधळे जिवंत नसल्याचा संशय व्यक्त करून खळबळ उडवून दिली आहे. “एखादा विषय अंगलट येतो तेव्हा तो माणूस गायब होतो, आणि मला वाटत नाही की हा माणूस सापडेल,” असेही ते म्हणाले.
प्रशासनाला मोकळेपणाने तपास करायचा असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, असे क्षीरसागर यांनी ठामपणे सांगितले. ते म्हणाले की, “पहिल्यांदाच हा विषय बाहेर आला आहे, आणि जर एखाद्या व्यक्तीला पकडायचे ठरवले तर तो २४ तासांत सापडतो. त्यामुळे कृष्णा आंधळे याच्या जीवाशी घातपात झाला असावा.” क्षीरसागर यांच्या या विधानामुळे खळबळ उडाली आहे.
Krushna Andhale l निष्पक्ष तपासासाठी राजीनाम्याची मागणी :
संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख प्रकरणी बोलताना अनेक गौप्यस्फोट केले. ते म्हणाले, “दादांचा (शरद पवार) स्वभाव असा आहे की चुकीची गोष्ट त्यांना कधीच पटत नाही. या प्रकरणी सरकारने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या आदेशावरून एसपींची बदली केली आहे.” गुन्हा नोंदवायला दहा-बारा तास उशीर झाला आणि ज्यांनी हा विलंब केला त्यांच्यावर कारवाई होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रकरणात लोकांनी स्वतःहून रस्त्यावर उतरून आवाज उठवला आहे, असे सांगत क्षीरसागर म्हणाले की, अन्याय झालेल्या लोकांनी पुढे येऊन बोलायला सुरुवात केली आहे. “बीड जिल्हा शल्यचिकित्सक चुकीचे काही करत असतील असे मला अजिबात वाटत नाही,” असे म्हणत त्यांनी शल्यचिकित्सकांचा बचाव केला.
News Title: Sandeep-Kshirsagar-Claims-Krushna-Andhale-May-Not-Be-Alive-Demands-Dhananjay-Munde-Resignation






