Samruddhi Highway | समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुण्याहून (Pune) मध्यप्रदेशला (Madhya Pradesh) दिवाळीसाठी निघालेल्या एका नोकरदार महिलेसोबत बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात विनयभंगाची घटना घडली आहे. या प्रकारामुळे महामार्गावरील, विशेषतः रात्रीच्या प्रवासादरम्यानच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मध्यरात्री पेट्रोल पंपावर विनयभंग :
पुण्यातील एका प्रतिष्ठित कंपनीत कार्यरत असलेली महिला आपल्या खाजगी वाहनाने दिवाळीनिमित्त मध्यप्रदेशातील घरी जात होती. प्रवासादरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील बिबी (Bibi) गावाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपावर ती थांबली असता, तेथील कर्मचाऱ्याने तिच्यासोबत गैरवर्तन केले.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, रात्रीची वेळ साधून पेट्रोल पंपावरील कर्मचारी आकाश इंगळे (Akash Ingle) याने तिची छेड काढली. रात्रीच्या वेळी महामार्गावर एका महिलेसोबत झालेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.
Samruddhi Highway | तात्काळ कारवाई, पण सुरक्षेचे काय? :
या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिलेने प्रसंगावधान राखत तात्काळ पोलीस हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच बिबी पोलीस (Bibi Police) तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनेची चौकशी करून आरोपी पेट्रोल पंप कर्मचारी आकाश इंगळे याला ताब्यात घेतले. त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे समृद्धी महामार्गावर वाढत्या गुन्हेगारीवर आणि महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.






