Samruddhi Expressway News | मुंबई ते नागपूर दरम्यानचा प्रवास जलद आणि सुलभ करणारा समृद्धी महामार्ग सध्या राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला पायाभूत प्रकल्प ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा हा महामार्ग आता पूर्ण क्षमतेने सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला झाला आहे. या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास अवघ्या आठ तासांत पूर्ण होतो, असा दावा केला जात असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या विकासाला मोठी चालना मिळत आहे. (Highway Closure Update)
दररोज लाखो वाहनचालक या महामार्गाचा वापर करत असून सुरुवातीला राजकीय वादविवाद झाल्यानंतर आता समृद्धी महामार्ग राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीचा महत्त्वाचा दुवा ठरत आहे. मात्र, या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. येत्या तीन दिवसांत काही ठरावीक वेळेसाठी हा महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
कधी आणि कुठे बंद राहणार महामार्ग? :
समृद्धी महामार्ग संपूर्ण दिवस बंद राहणार नसला तरी २७ डिसेंबर २०२५ ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत दररोज सुमारे एक तास महामार्गावरील वाहतूक थांबवली जाणार आहे. ही वाहतूकबंदी सर्व मार्गावर लागू न होता, काही ठरावीक गावांच्या परिसरातच लागू राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरगावंडी आणि टिटवा या गावांच्या हद्दीत महामार्ग तात्पुरता बंद राहणार आहे. २७ डिसेंबर रोजी नगरगावंडी गावाजवळ मुंबईकडील वाहिनी दुपारी दोन ते तीन किंवा तीन ते चार या वेळेत बंद ठेवली जाणार आहे. तर २८ डिसेंबर रोजी याच ठिकाणी नागपूरकडील वाहिनी दुपारी दोन ते तीन किंवा तीन ते चार या कालावधीत बंद राहणार आहे.
त्याचप्रमाणे, २९ डिसेंबर रोजी टिटवा गावाजवळ मुंबईकडील आणि नागपूरकडील दोन्ही वाहिन्यांवरील वाहतूक सकाळी अकरा ते दुपारी बारा किंवा दुपारी बारा ते एक या वेळेत थांबवली जाणार आहे. या कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Samruddhi Expressway News | महामार्ग बंद ठेवण्यामागील कारण काय? :
समृद्धी महामार्गावरून दर महिन्याला दहा लाखांहून अधिक वाहने प्रवास करत असून गेल्या काही महिन्यांत वाहनसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. वाढत्या वाहतुकीचा विचार करता महामार्गावरील तांत्रिक आणि संरचनात्मक कामे वेळोवेळी करणे आवश्यक ठरत आहे. (Samruddhi Expressway News)
राज्य रस्ते विकास महामंडळाकडून धामणगाव ते चांदूर रेल्वे दरम्यान महामार्गावर गॅन्ट्री बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या गॅन्ट्रीच्या स्थापनेसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गावर तात्पुरती वाहतूकबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन संबंधित यंत्रणेकडून करण्यात आले आहे.






