Sampada Munde | सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटण (Phaltan) शहरात एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या या डॉक्टरने आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलेल्या चिठ्ठीत दोन पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून वैद्यकीय आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ माजली आहे.
हातावरील नोटमधून धक्कादायक खुलासा-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात सेवा बजावणाऱ्या डॉ. संपदा मुंडे (Sampada Munde) यांनी शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले. त्यांच्या आत्महत्येची बातमी कळताच वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला. या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले ते त्यांच्या हातावर सापडलेल्या सुसाईड नोटमुळे.
डॉ. मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर पेनाने आपल्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींची नावे लिहिली. त्यांनी पोलीस निरीक्षक गोपाल बदने (PSI Gopal Badne) आणि पोलीस प्रशांत बनकर (Police Prashant Bankar) या दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावे घेत, त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या नोटमुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून पोलीस दलातही खळबळ उडाली आहे.
आत्महत्येमागील संभाव्य कारणे आणि तपासाची दिशा
डॉ. संपदा मुंडे (Sampada Munde) यांनी आपल्या हातावर लिहिलेल्या नोटमध्ये अत्यंत धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांनी लिहिले आहे की, “माझ्या मरणास पोलीस निरीक्षक गोपाल बदने जबाबदार आहे, ज्याने ४ वेळा माझ्यावर अत्याचार केले. तसेच, पोलीस प्रशांत बनकर यानेही मागच्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला.” हे शब्द या प्रकरणाची तीव्रता दर्शवतात.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मुंडे या गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील एका वादग्रस्त प्रकरणात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणीच्या मुद्द्यावरून पोलीस कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादामुळे त्या चर्चेत आल्या होत्या आणि त्यांच्यावर अंतर्गत चौकशीदेखील सुरू होती. या तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नोटमधील थेट लैंगिक अत्याचार आणि छळाच्या आरोपांमुळे पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून, आता आरोपी अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






