Saif Ali Khan | बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी (16 जानेवारी) प्राणघातक हल्ला झाला. सैफ अली खानच्या घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या एका चोराने त्याच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात आला असून त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या विजय दासला अटक करण्यात आली आहे. त्याला ठाण्यातील कासारवडवली भागातून अटक करण्यात आली. सैफ अली खानवर अटक करणाऱ्या आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या त्याची कसून पोलीस चौकशी सुरू आहे. त्यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरोपी बांगलादेशी असल्याचा पुरावा-
सैफ अली (Saif Ali Khan) खानवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर ४ दिवसांनी मुंबई पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद उर्फ विजय दास असे या आरोपीचे नाव आहे. तो बांगलादेशचा नागरिक असल्याचा दावा पोलिसांनी केला होता.
आता चौकशीदरम्यान विजय दास हा बांगलादेशी असल्याचा एक ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याचा वाहतुकीचा परवाना समोर आला आहे. हा परवाना बांगलादेशातील असून त्यावर नाव, पत्ता, जन्मतारीख तसेच इतर माहितीही नमूद करण्यात आली आहे.
आरोपीचे वाहतूक परवाना-
सैफवर (Saif Ali Khan) हल्ला करणाऱ्या मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याचे वाहतुकीचे लायसन्स पोलिसांच्या हाती लागले आहे. या लायसन्सवर ‘बांगलादेश रोड ट्रान्सपोर्ट ऑथरिटी’असे लिहिण्यात आले आहे. यावर ‘बरिसल’ असे लिहिण्यात आले असून त्याचा पत्ताही बरिसल सदर, बरिसल असा आहे. शहजादला हे लायसन्स 21 नोव्हेंबर 2019 ला बांगलादेश रोड ट्रान्सपोर्ट ऑथरिटीकडून देण्यात आले आहे.
हे लायसन्स 21 फेब्रुवारी 2020 रोजी संपले आहे. हे लायसन्स दुचाकी आणि हलक्या वाहनांसाठी देण्यात आले आहे. यावर त्याची 12 मार्च 1994 अशी त्याची जन्मतारीखही दिसत आहे. तसेच यावर त्याचा फोन नंबरही नमूद करण्यात आला आहे. यासोबतच यावर त्याचा फोटोही पाहायला मिळत आहे.
नवी मुंबईत बांगलादेशी नागरिकांवर कारवाई-
दरम्यान अभिनेता सैफ अली (Saif Ali Khan) खान याच्यावर हल्ला करणारा बांगलादेशी असल्याचे समोर येताच नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे ॲक्शन मोडवर दिसून येत आहेत. सध्या नवी मुंबईत अनेक बांगलादेशी नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. नवी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी राहताना दिसून येत आहेत. झोपड्या, अनधिकृत बांधकामांमध्ये हे बांगलादेशी आश्रय घेत आहेत.
तसेच यांनी बनावट पॅनकार्ड आधारकार्डही बनवले आहेत. गेल्या महिनाभरामध्ये बांगलादेशातील संशयित म्हणून हजारोंपेक्षा अधिक नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर 125 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 300 जणांचे कागदपत्र तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे कागदपत्र आढळून आले तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाणार आहे. आतापर्यंत 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.






