Gunratna Sadavarte | मुंबईतील (Mumbai) एसटी बँकेच्या (ST Bank) संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या गदारोळानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratan Sadavarte) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे. आमच्या महिला पदाधिकाऱ्यांचे लैंगिक शोषण करण्यात आल्यानेच आम्ही त्यांना ‘ठेचले’, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. याप्रकरणी आपल्याकडे सर्व पुरावे असून, पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.
‘लिंगपिसाटांना’ धडा शिकवल्याचा दावा :
गुणरत्न सदावर्ते (Gunratan Sadavarte) यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “एसटी बँकेमध्ये (ST Bank) जो राडा झाला, त्यात आमच्या लाडक्या बहिणींना त्रास दिला म्हणून आम्ही त्यांना ठेचलं.” विरोधकांपैकी काही जण अहिल्यादेवी होळकरांच्या लेकींवर वाईट नजर ठेवून आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. त्यांच्या मते, एका मराठा, एका आदिवासी आणि एका वंजारी समाजाच्या, अशा तीन महिला पदाधिकाऱ्यांना लैंगिक शोषणाचा त्रास देण्यात आला.
या महिलांना दिलेल्या त्रासामुळे आमच्या भावनांचा उद्रेक झाला आणि अशा ‘लिंगपिसाटांना’ धडा शिकवण्यात आला, असे सदावर्ते म्हणाले. आपण प्रसिद्धीसाठी हापापलेले नसून, आपल्याकडे या शोषणाचे सबळ पुरावे आहेत आणि त्याच आधारावर पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत, असा दावाही त्यांनी केला.
Gunratna Sadavarte | आनंदराव अडसुळांवर घणाघात :
याच पत्रकार परिषदेत गुणरत्न सदावर्ते यांनी माजी खासदार आणि एसटी बँकेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांच्यावर जोरदार टीका केली. “एसटी बँकेतील राड्यानंतर आनंदराव अडसूळ पोलीस ठाण्यात का गेले होते? अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना पाठिंबा देण्यासाठी ते गेले होते का?” असा थेट सवाल सदावर्ते यांनी उपस्थित केला. अडसूळ यांच्यावर यापूर्वी बँक बुडवल्याचे आरोप असून, ते आयोगावर राहूनही आयोगाच्याच जातीतील लोकांवर अत्याचार करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.(Gunratan Sadavarte)
या प्रकरणात अडसूळ यांची नेमकी भूमिका काय आहे, हे स्पष्ट करून त्यांची आयोगावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी सदावर्ते यांनी केली. “लय जुनं म्हातारं आहे म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेब त्यांना सोबत ठेवत असतील,” असे म्हणत, आपण याप्रकरणी एकनाथ शिंदे यांच्याकडे आनंदराव अडसूळ यांची तक्रार करणार असल्याचे सदावर्ते यांनी स्पष्ट केले. शिंदे साहेब लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना कधीही पाठबळ देणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.






