Sadabhau Khot | पुण्यातील फुरसुंगी भागातील द्वारकाधीश गोशाळेजवळ आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना गोरक्षकांकडून धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या जनावरांबाबत विचारपूस करण्यासाठी ते कार्यकर्त्यांसह गोशाळेत गेले असता, गोरक्षकांनी आक्षेप घेत राडा घातल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणामुळे गोवंश संरक्षणाच्या नावाखाली शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
खोत यांनी सांगितले की, गोवंश कायद्याच्या आड शेतकरी दुधाळ जनावरे विकायला गेले तरी त्यांना अडवणे, मारहाण करणे आणि जनावरे जप्त करून गोशाळेत ठेवणे असे प्रकार वाढले आहेत. पोलिस ठाण्यातून जनावरे गोशाळेत हलवली की दिवसाला 200 ते 500 रुपये शुल्क आकारले जाते; प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढतो आणि जनावरे परत मिळवणे कठीण होते. सरकारने या साखळीवर तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी खोत यांनी केली.
नेमकं प्रकरण काय? :
सांगली जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या 10 म्हशी गोरक्षकांनी जबरदस्तीने नेल्याचा आरोप दोन महिन्यांपूर्वी करण्यात आला होता. संबंधित शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेत म्हशी परत देण्याचे आदेश मिळवले; त्यानंतर ते आदेश घेऊन पुण्यातील फुरसुंगी येथील द्वारकाधीश गोशाळेत पोहोचले असता म्हशी तिथे नसल्याचे उघड झाले. यावर गोशाळेतील गोरक्षकांनी “म्हशींना चरायला डोंगरावर सोडले आणि त्या निघून गेल्या” अशी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) स्वतः परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले असता वाद निर्माण झाला आणि गोरक्षकांकडून त्यांना व उपस्थित शेतकऱ्यांना धक्काबुक्की झाल्याचे सांगितले जाते. “शेतकऱ्यांची ना दाद ना फिर्याद” अशी स्थिती निर्माण झाल्याने खोत यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. घटनेनंतर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती स्थानिक पातळीवर समोर आली.
Sadabhau Khot | खोतांची भूमिका आणि सरकारकडे आवाहन :
“गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी तयार झाली असून तिची कार्यालयीन यंत्रणा कार्यरत आहे,” असा आरोप खोत यांनी केला. त्यांच्यानुसार शेतकऱ्यांना अडकवणे, जनावरे जप्त करून आर्थिक दडपण आणणे आणि प्रकरणे लांबणीवर टाकणे या प्रकारांनी ग्रामीण अर्थचक्राला घाला बसतो. “कारवाई झाली नाही तर आम्ही पोलीस स्टेशनसमोरच जनावरांच्या छावण्या उभारू,” असा इशाराही खोत यांनी दिला.
या घटनेला राजकीय रंगही मिळाल्याचे दिसते. खोत यांच्यावर झालेल्या धक्काबुक्कीच्या पार्श्वभूमीवर सरकारने स्पष्ट धोरण जाहीर करून शेतकऱ्यांच्या जनावरांबाबत कायदेशीर प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशी मागणी होत आहे. शेतकरी संघटनांनी घटनाक्रमाचा निषेध नोंदवत, न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करून म्हशी शोधून काढण्याची आणि जबाबदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.






