Sachin Pilgaonkar | ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगांवकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा आणि दिग्दर्शनाचा ठसा उमटवला आहे. नुकत्याच काही विधानांमुळे चर्चेत आलेले सचिन पिळगांवकर आता त्यांच्या एका वेगळ्याच अनुभवामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका चाहतीने दाखवलेल्या प्रेमाचा आणि आदराचा एक अविस्मरणीय किस्सा त्यांनी सांगितला आहे, जो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
बॅडमिंटन खेळून बाहेर पडताना घडला प्रसंग
सचिन पिळगांवकर यांनी एका मुलाखतीदरम्यान तीन महिन्यांपूर्वी घडलेला हा प्रसंग सांगितला. ते म्हणाले, “मी अंधेरी येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधून बॅडमिंटन खेळून बाहेर येत होतो. तिथे अनेक महिला आपल्या मुलांना अॅरोबिक्ससाठी घेऊन येतात. त्यापैकीच एक साधारण 30-34 वर्षांची महिला होती.”
त्या महिलेने सचिनजींना पाहताच ओळखले आणि त्यांच्याशी संवाद साधला. तिने स्वतःची ओळख करून देत म्हटले, “सचिनजी, नमस्कार! मी तुमचे काम लहानपणापासून पाहत आले आहे. मला तुमचे काम खूप आवडते. मी तुमचे बालपणीचे चित्रपटही युट्यूबवर पाहिले आहेत. ‘कट्यार काळजात घुसली’मध्ये तर तुम्ही अप्रतिम काम केले आहे.”
Sachin Pilgaonkar | चाहतीने देऊ केले ५०० रुपये
त्या चाहतीने सचिनजींच्या कामाचे कौतुक करत पुढे म्हटले, “तुम्ही इतकी वर्षे काम करत आहात, त्यामुळे मला तुम्हाला माझ्याकडून काहीतरी द्यायचे आहे.” असे म्हणत त्या महिलेने आपली पर्स उघडली आणि त्यातून ५०० रुपयांची नोट काढून सचिन पिळगांवकर यांच्याकडे देत म्हणाली, “तुम्ही हे माझ्याकडून घ्या. माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी दुसरे काहीच नाहीये.”
एका चाहतीने व्यक्त केलेल्या या निखळ प्रेमाने आणि आदराने सचिन पिळगांवकर भारावून गेले. त्यांनी सांगितलेला हा किस्सा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, या व्हिडिओवर काही नेटकऱ्यांनी टीकात्मक प्रतिक्रिया देत, “आम्ही तुम्हाला ५०० रुपये देतो, पण तुम्ही हा किस्सा सांगणे बंद करा,” अशा कमेंट्स केल्या आहेत.






