Medha Kulkarni controversy | पुण्यातील शनिवारवाड्यात मुस्लीम महिलांनी नमाज पठण केल्याचा आरोप करून भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी “केवळ हिंदू धर्मियांनाच प्रवेश द्या” अशी मागणी केली. या वक्तव्यामुळे राजकीय वाद पेटला असून महायुतीतूनच मेधा कुलकर्णींना विरोधाचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी त्यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला.
रुपाली पाटील म्हणाल्या, “खासदार असूनही मेधा कुलकर्णींना कायद्याची अजिबात अक्कल नाही. शनिवारवाडा त्यांच्या पप्पांचा नाही. पुण्यात हिंदू-मुस्लीम बांधव अत्यंत गुण्यागोविंदाने नांदत आहेत. जातीजातीत तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करावा, अन्यथा आम्ही न्यायालयात धाव घेऊ.”
राष्ट्रवादीचे आंदोलन, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणांनी शनिवारवाडा दुमदुमला :
मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात जोरदार आंदोलन केले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय”च्या घोषणांनी शनिवारवाडा परिसर दणाणून सोडला. आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.
रुपाली पाटील म्हणाल्या, “आमचा संघर्ष भाजपशी नाही, तो मेधा कुलकर्णी यांच्या विचारांशी आहे. त्या स्वत:ला कट्टर हिंदुत्ववादी म्हणवतात, पण हिंदुत्वाचा खरा अर्थ त्यांना माहित नाही. समाजात तेढ निर्माण करणे आणि मतभेद पसरवणे हे हिंदुत्व नाही.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की “कोण कट्टर हिंदू आहे याचे प्रमाणपत्र वाटण्याचा अधिकार मेधा कुलकर्णींना कोणी दिला नाही.”
Medha Kulkarni controversy | “सौभाग्याचे लेणे हिरवा रंग, मग हिरव्याचा द्वेष का?” :
मेधा कुलकर्णींनी ट्विटरवर मुस्लीम महिलांच्या नमाज पठणाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना रुपाली पाटील म्हणाल्या, “हा व्हिडिओ कधीचा आहे हे माहित नाही, पण तो खरा असला तरी नमाज पठणामुळे नेमका कोणता धोका निर्माण झाला?”
त्या पुढे म्हणाल्या, “हिंदू धर्मात सौभाग्याचे प्रतीक म्हणजे हिरवा रंग मानला जातो. मग हिरव्याचा द्वेष का केला जातो? समाजात सलोखा राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.” शनिवारवाड्याच्या पुढील भागात असलेली मजारी १९३६ सालीच पुरातत्त्व विभागाकडे नोंद झालेली असल्याचेही त्यांनी सांगितले. “केवळ हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करणे हेच मेधा कुलकर्णी यांचे ध्येय दिसते,” असा आरोप त्यांनी केला.






