Maharashtra politics | कुर्डुवाडी प्रकरणानंतर अजित पवार यांच्याविरोधात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांच्या भूमिकेनंतर दादांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. मात्र, या प्रकरणावरून अजितदादांना जाणूनबुजून अडचणीत आणले जात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. त्यांनी केलेलं ट्वीट आता राजकीय वर्तुळात चांगलंच व्हायरल होत आहे.
रोहित पवार यांनी या प्रकरणात स्पष्ट केलं की, घोळ हा अजित पवारांच्या (Ajit Pawar) हिंदी व बोलण्याच्या शैलीमुळे झाला होता, मात्र यावरून प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जात आहे. त्यामुळे दादांना जाणीवपूर्वक अडचणीत टाकले जात आहे, असा त्यांचा आरोप आहे.
मित्रपक्षाकडून मीडिया ट्रायल? :
या प्रकरणात रोहित पवार यांनी थेट महायुतीतील मित्रपक्षाकडे बोट दाखवलं आहे. अजितदादांच्या मित्रपक्षाकडूनच मीडिया ट्रायल करण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, युवांच्या समस्या, महिला सुरक्षेचे विषय किंवा भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढे न करता दादांच्या नावावरच मीडिया ट्रायल करून राजकीय स्कोअर सेट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. (Ajit Pawar Controversy)
दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांनी सुरुवातीला भूमिका घेतली होती, पण नंतर पक्षातून प्रकरणावर पडदा टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचं रोहित पवार यांनी सूचित केलं. यामुळे पक्षांतर्गत वातावरणही ढवळून निघालं आहे.
Maharashtra politics | पक्षातील कुरघोड्यांवर थेट इशारा :
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांवरही अप्रत्यक्ष टीका केली आहे. आपल्या नेत्याची विनाकारण मीडिया ट्रायल होत असताना, पक्षातील दोन-तीन नंबरच्या नेत्यांनी मित्रपक्षाला प्रो भूमिका घेत कुरघोड्या करणे योग्य नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “चहापेक्षा किटली गरम असणारे” एक-दोन सहकारी असतील तर आमदार सोबत असूनही सर्व काही आलबेल नसते, असा थेट टोला त्यांनी लगावला.
यामुळे रोहित पवारांचा रोख नेमका कुणावर आहे याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. मात्र, यावेळी त्यांनी कुणाचं नाव न घेता अप्रत्यक्ष शाब्दिक बाण सोडले आहेत. (Ajit Pawar Controversy)
राजकारणातल्या या ताज्या घडामोडींमुळे अजित पवारांच्या पक्षातील अंतर्गत समीकरणं पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. रोहित पवारांनी केलेल्या ट्वीटमुळे केवळ महायुतीतीलच नव्हे तर राष्ट्रवादी पक्षातील गटबाजीही उघडकीस येत असल्याचं बोललं जात आहे.






