Rohit Arya Encounter | मुंबईतील पवई परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी निर्णायक कारवाई करत रोहित आर्या (Rohit Arya Encounter) या व्यक्तीचा एन्काऊंटर केला आहे. आरए स्टुडिओत तब्बल 17 मुलांना ओलीस ठेवण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात वेगाने मोहीम राबवली. दरम्यान, मुलांची सुटका करताना झालेल्या चकमकीत रोहित आर्याचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मुलांची सुटका करताना रोहित आर्याने प्रतिकार केल्याने त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. त्याच्या छातीला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला होता. लगेचच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुदैवाने सर्व 17 मुले सुखरूप वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे.
आरए स्टुडिओतील ‘ऑडिशन’मागे काय घडलं होतं? :
गेल्या सहा दिवसांपासून पवई येथील आरए स्टुडिओत एका वेब सिरीजसाठी ऑडिशन सुरू असल्याची माहिती होती. सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालत होती. मात्र गुरुवारी मुलं जेवणासाठी बाहेर आली नाहीत, यामुळे संशय निर्माण झाला. त्यानंतर तपासात 17 मुलांना डांबून ठेवण्यात आले असल्याचे समोर आले. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. (Rohit Arya Encounter in mumbai)
पोलिसांनी तत्काळ स्टुडिओकडे धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत रोहित आर्याकडे एअर गन आणि काही केमिकल्स असल्याचे समोर आले. त्याने मुलांना ओलीस ठेवून एक व्हिडिओही पाठवला होता, ज्यात तो काही ‘प्रश्न विचारणार’ असल्याचे म्हणताना दिसतो. मात्र नेमके कोणत्या विषयावर त्याला बोलायचे होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Rohit Arya Encounter | एन्काऊंटरदरम्यान काय घडलं? :
मुलांची सुटका करण्यासाठी पोलिसांनी रोहितसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तोडगा न निघाल्याने पोलिसांनी स्टुडिओच्या मागच्या बाजूने प्रवेश केला. यावेळी पोलिस आणि रोहित आर्या यांच्यात चकमक झाली. बाथरुमच्या काचा तोडून आत घुसलेल्या पोलिसांवर त्याने एअर गनने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला आणि त्यात रोहित आर्या जखमी झाला.
त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन रुग्णालयात हलवले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पवई परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला असून पुढील तपास सुरू आहे.






