Rohit Arya Encounter | पवई एन्काऊंटरनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. रोहित आर्यावर पोलिसांनी छातीवर गोळी झाडली, यामागील कारणांवर आता वाद सुरू झाला आहे. राज्य पोलिसांनी आपलं अपयश झाकण्यासाठी एन्काऊंटर केल्याचा आरोप एडवोकेट नितीन सातपुते यांनी केला आहे.
एन्काऊंटरवर गंभीर आरोप :
“राज्य पोलिसांचं अपयश झाकण्यासाठी रोहित आर्याचा (Rohit Arya Encounter) एन्काऊंटर करण्यात आला. वरिष्ठांकडून दबाव होता,” असा गंभीर आरोप वकील नितीन सातपुते यांनी केला. “निष्पाप मुलांचं संरक्षण करण्यात पोलीस दल अपयशी ठरलं. मग रोहितच्या छातीत का गोळी मारली? शरीराच्या खालच्या भागावर गोळी चालवली नाही का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सातपुते म्हणाले, “रोहित आर्यच्या (Rohit Arya Encounter) स्टेटमेंटनुसार, राज्य सरकारने त्याची 2 कोटी रुपयांनी फसवणूक केली. 17 अल्पवयीन मुलं आणि दोन प्रौढ नागरिकांचं अपहरण रोहितने केलं असलं तरी यासाठी पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे.”
Rohit Arya Encounter | ‘ए थर्सडे’ चित्रपटाशी साधर्म्य :
वकील सातपुते म्हणाले, “या प्रकरणातील बऱ्याच गोष्टी यामी गौतमच्या ‘ए थर्सडे’ या चित्रपटाशी साधर्म्य दाखवतात. त्या चित्रपटात यामी गौतम शालेय मुलांना ओलीस ठेऊन सरकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधते. तसंच काहीसं रोहित आर्याने केलं. त्याला आत्महत्या करायची होती, पण नंतर त्याने मागण्या मान्य करुन घेण्यासाठी मुलांना ओलीस ठेवलं.”
सातपुते यांच्या मते, “पोलीस हिरो बनत आहेत. पण सत्य कोर्टात उघड होईल. याचिका दाखल केल्यानंतर या एन्काऊंटरमागचं खरं कारण समोर येईल.”
“हिरो बनण्याचं स्वप्न बाळगणारे अधिकारी” :
“सीनियर पी.आय. जितेंद्र सोनवणे (PSI Jitendra sonawane) आणि काही अन्य अधिकाऱ्यांचं हिरो बनण्याचं स्वप्न आहे. याआधी अनेक एन्काऊंटर स्पेशलिस्ट जेलमध्ये गेले आहेत. मी कोर्टात जाणार आहे. ज्यांनी हा एन्काऊंटर केला त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि तपास व्हावा. मंत्री असो वा अधिकारी, चौकशी झालीच पाहिजे,” असा इशारा नितीन सातपुते यांनी दिला.






