IPL 2025 l आयपीएल 2025 मध्ये बुधवारी झालेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात एक विवादास्पद क्षण पाहायला मिळाला. रियान परागने अंपायरच्या निर्णयावर आक्षेप घेतल्याने मैदानातच वाद उफाळून आला. सामन्यात गुजरातने राजस्थानचा 58 धावांनी पराभव केला, मात्र या सामन्याची खरी चर्चा झाली ती रियान परागच्या आक्रमक प्रतिक्रिया आणि पंचांशी झालेल्या शाब्दिक वादामुळे.
राजस्थान रॉयल्सला 218 धावांचं आव्हान मिळालं होतं. डावाच्या सुरुवातीलाच दोन विकेट्स गेल्यानंतर कर्णधार संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परागने 14 चेंडूंमध्ये 26 धावा करत आक्रमक सुर ठेवला. मात्र सातव्या षटकात कुलवंत खेजरोलियाच्या चेंडूवर यष्टीरक्षक जोस बटलरने झेल घेतल्याचे सांगत अंपायरने त्याला बाद ठरवलं.
डीआरएस घेतल्यावरही निर्णयावर संताप :
परागने तात्काळ डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. अल्ट्रा एज रिप्लेमध्ये स्पाइक स्पष्टपणे दिसून आला आणि तिसऱ्या पंचानेही त्याला बाद घोषित केले. पण रियान पराग याने हा स्पाइक बॅट जमिनीला लागल्यामुळे निर्माण झाल्याचा दावा केला. “हा बॉल-बॅटचा संपर्क नाही, तर बॅट जमिनीवरून घासल्याचा आवाज आहे,” असं त्याचं म्हणणं होतं.
या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना रियान परागने मैदानावरच पंचांशी संवाद साधला, काही वेळ पंचांशी चर्चा केल्यानंतर तो शेकिंग हेड करत डगआऊटकडे गेला. हजारोंच्या समोर झालेला हा प्रसंग सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, अनेक क्रिकेटप्रेमींनी परागच्या भावनांची बाजू घेतली आहे.
IPL 2025 l संघासाठी मोठा धक्का :
रियान परागचा बाद होणं राजस्थानसाठी मोठा धक्का ठरला. संघाचा डाव पुन्हा ढासळू लागला आणि संपूर्ण संघ 159 धावांवर आटोपला. गुजरात टायटन्सने हा सामना 58 धावांनी जिंकत पॉइंट्स टेबलवर आपली स्थिती भक्कम केली. परागने मात्र मैदान सोडलं तरी संताप स्पष्टपणे दिसून आला.
आयपीएलच्या आचारसंहितेनुसार पंचांच्या निर्णयावर असंतोष व्यक्त करणे किंवा मैदानात वाद घालणे हे शिस्तभंग मानलं जातं. त्यामुळे रियान परागवर आर्थिक दंड किंवा इतर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






