Revenue Department | राज्याच्या महसूल विभागात दीर्घकाळ प्रलंबित असलेला पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले की, महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा अनुशेष येत्या तीन महिन्यांत भरून काढला जाणार आहे. या निर्णयामुळे विभागातील शेकडो अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
महसूल मंत्री बावनकुळे यांनी सोमवारी राज्यातील ४७ महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची भेट दिली. यात २३ अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) पदावर, तर २४ उपजिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदावर बढती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक अधिकाऱ्यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) जाण्याचा मार्ग खुला झाला आहे. शासन निर्णयही तत्काळ जारी करण्यात आला आहे.
दीर्घकाळापासून महसूल विभागात पदोन्नतींचा अनुशेष प्रलंबित होता. अनेक अधिकाऱ्यांची वरिष्ठता आणि कामाचा अनुभव असूनही त्यांना हक्काची बढती मिळत नव्हती. अखेर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला म्हणुन हा मुद्दा सोडवण्यात आला आहे.
Revenue Department | बावनकुळे यांचा पुढाकार आणि पूर्वीचे निर्णय
यापूर्वीही महसूल मंत्री बावनकुळे यांनी शासनाच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात १२५ उपजिल्हाधिकाऱ्यांना निवडश्रेणी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील अनेक अधिकारी आता अतिरिक्त जिल्हाधिकारी बनले आहेत. विभागातील कामकाजाचा वेग वाढवण्यासाठी आणि प्रशासन अधिक कार्यक्षम करण्यासाठी या पदोन्नती महत्त्वाच्या ठरल्या आहेत. तसेच, सध्या तहसिलदार ते उपजिल्हाधिकारी पदोन्नतीची प्रक्रिया सुरू असून नव्याने उपजिल्हाधिकारी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) भरण्याची तयारी सुरू आहे.
त्यामुळे महसूल प्रशासनातील रिक्त पदे भरली जाणार असून जिल्हास्तरीय कामकाज अधिक गतीमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महसूल विभागात आनंदाचे वातावरण या निर्णयामुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांमध्ये दिवाळीपूर्वीचा उत्सवमूढ आनंद पसरला आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेली पदोन्नती ही केवळ हक्काची बाब नसून, त्यांच्या कठोर परिश्रमांचे फलित असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. महसूल विभागात नव्या पदोन्नतींमुळे कामकाज अधिक वेगवान आणि पारदर्शक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बावनकुळे यांनी दिलेली हमी पुढील तीन महिन्यांत उर्वरित अनुशेष भरून काढला जाईल ही अधिकाऱ्यांसाठी नवी ऊर्जा घेऊन आली आहे. महसूल विभागातील ही सकारात्मक हालचाल शासनाच्या कार्यक्षमतेचे द्योतक ठरत आहे.






