Travis Head ad l ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ट्रॅव्हिस हेड (Travis Head) झळकलेल्या Uber Moto च्या जाहिरातीवरून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाने थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. RCBने दावा केला आहे की या जाहिरातीत त्यांच्या ट्रेडमार्कचा विनोदी पद्धतीने वापर करून संघाची प्रतिमा डागळली आहे.
‘रॉयली चॅलेंज्ड बेंगळुरू’ या वाक्यावरून RCB संतप्त :
रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने – Uber विरोधात दाखल केलेल्या खटल्यात म्हटले आहे की, Uberने 5 एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत त्यांच्या लोकप्रिय घोषणेचा विकृत वापर केला आहे. ही जाहिरात ‘हैदराबादी’ मोहीम अंतर्गत Uber Moto बाईक टॅक्सी सेवा प्रमोट करण्यासाठी करण्यात आली होती, ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू ट्रॅव्हिस हेड प्रमुख भूमिकेत आहे.
या जाहिरातीत ट्रॅव्हिस हेडला बेंगळुरूच्या मैदानात प्रवेश करताना दाखवण्यात आले आहे. यावेळी त्याच्यावर “बंगलोर विरुद्ध हैदराबाद” या साइनबोर्डवरील मजकूर बदलून “रॉयली चॅलेंज्ड बेंगळुरू” असं लिहिलेलं दाखवलं जातं. त्यानंतर सिक्युरिटी त्याला पाहते आणि तो Uber Moto बाईकवरून पळून जातो. ही जाहिरात सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. मात्र RCBच्या मते, या जाहिरातीतून त्यांची खिल्ली उडवली गेली असून संघाच्या ब्रँडवर परिणाम झाला आहे.
Travis Head ad l Uberकडून विनोदी आशयाचं स्पष्टीकरण, जाहिरात हटवण्यास नकार :
Uberने कोर्टात मांडलेल्या युक्तिवादात स्पष्ट केले की ही जाहिरात विनोदी पद्धतीने सादर करण्यात आली आहे आणि त्याचा उद्देश बेंगळुरूच्या वाहतूक समस्येवर भाष्य करत Uber Moto चा वेगवान पर्याय दर्शवणं होता. त्यांनी असेही स्पष्ट केले की जाहिरातीत RCBचे ट्रेडमार्क थेट वापरले गेले नाहीत, तर ही एक सर्जनशील अभिव्यक्ती होती.
13 मे रोजी होणाऱ्या SRH आणि RCB यांच्यातील सामन्याला लक्ष्य करत जाहिरातीचा आशय तयार करण्यात आला होता, असं Uberने स्पष्ट केलं. त्यांनी ही जाहिरात सर्जनशील स्वातंत्र्याच्या परिघात येते असे सांगून ती मागे घेणे योग्य ठरणार नाही, असेही कोर्टात मांडले. कारण ही जाहिरात 10 दिवसांपूर्वी प्रसारित झाली असून यामुळे मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया कव्हरेजही झाली आहे.






