RCB l आयपीएल 2025 च्या 20 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) मुंबई इंडियन्सवर विजय मिळवून इतिहास रचला आहे. वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 221 धावांचा डोंगर उभारला, आणि प्रत्युत्तरात मुंबईला फक्त 209 धावांवर रोखून 12 धावांनी सामना जिंकला.
या विजयासह आरसीबी आयपीएलच्या इतिहासात एकाच हंगामात मुंबई इंडियन्स (Wankhede), चेन्नई सुपर किंग्ज (चेपॉक) आणि कोलकाता नाईट रायडर्स या तिन्ही दिग्गज संघांना त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करणारा दुसरा संघ ठरला आहे. यापूर्वी ही कामगिरी 2012 मध्ये पंजाब किंग्जने केली होती.
कोहली-पाटीदारची फटकेबाजी :
वानखेडेवर टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीकडून विराट कोहलीने 67 आणि रजत पाटीदारने 64 धावांची शानदार खेळी साकारली. दोघांनी मिळून भक्कम अर्धशतके झळकावत संघाला 221 धावांपर्यंत नेले. मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 222 धावांचे आव्हान होते.
मुंबईकडून हार्दिक पांड्या (hardik pandya) आणि नमन धीर (Naman dhir) शेवटच्या टप्प्यात फलंदाजी करत होते. शेवटच्या 12 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज होती. पण जोष हेझलवूडने 19 व्या षटकात हार्दिकला बाद करत फक्त 9 धावा दिल्या. सामना निर्णायक वळणावर असताना, शेवटचे षटक कर्णधार रजत पाटीदारने फिरकीपटू कृणाल पांड्याकडे (Kunal pandya) सोपवले, ज्याने पहिल्या दोन चेंडूंमध्ये दोन बळी घेतले आणि सामना आरसीबीच्या (RCB) बाजूने फिरवला.
कृणालने पहिले बळी सँटरनरचा घेतला आणि दुसऱ्याच चेंडूवर दीपक चहरला बाद केलं. पुढे त्याने नमन धीरलाही पॅव्हेलियन दाखवत आरसीबीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
RCB l इतिहासाची पुनरावृत्ती :
आरसीबीचा हा हंगाम उल्लेखनीय ठरत आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच त्यांनी ईडन गार्डन्सवर केकेआरचा 7 गडी राखून पराभव केला, त्यानंतर चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सीएसकेवर 50 धावांनी विजय मिळवला. गुजरातकडून एक पराभव पत्करल्यानंतर त्यांनी वानखेडेवर मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला.
यासह, आरसीबी एकाच हंगामात तीन मोठ्या संघांना त्यांच्या घरच्या मैदानावर हरवणारा दुसरा संघ बनला आहे, ज्यामुळे संघाच्या आत्मविश्वासात मोठी भर पडली आहे.






