RBI Cheque New Rule | भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील बँकिंग प्रणालीत मोठा बदल जाहीर केला आहे. आता चेक वटवण्यासाठी दोन दिवसांची प्रतिक्षा संपणार असून, काही तासांतच धनादेशाची रक्कम खात्यात जमा होणार आहे. या नव्या व्यवस्थेमुळे चेक क्लिअरिंगची गती वाढेल, जोखीम कमी होईल आणि ग्राहकांना अधिक वेगवान सेवा मिळेल.
RBIने settlement on realization या संकल्पनेच्या दिशेने पाऊल टाकत, चेक क्लिअरिंगसाठी नवीन प्रक्रिया जाहीर केली आहे. यात चेक मिळताच तो स्कॅन करून थेट क्लिअरिंगसाठी पाठवला जाईल. सकाळी 10 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत एकाच सत्रात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. (RBI Cheque New Rule)
4 ऑक्टोबरपासून दोन टप्प्यात अंमलबजावणी :
ही नवी प्रणाली दोन टप्प्यात लागू केली जाणार आहे. पहिला टप्पा 4 ऑक्टोबर 2025 ते 2 जानेवारी 2026 पर्यंत चालेल. या टप्प्यात, धनादेश प्राप्त झाल्यावर संबंधित बँकेने संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तो स्वीकारल्याची पुष्टी द्यावी लागेल. जर बँकेने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, तर चेक स्वीकारल्याचे गृहीत धरले जाईल आणि पुढील प्रक्रिया सुरु होईल.
दुसरा टप्पा 3 जानेवारी 2026 पासून कायमस्वरूपी लागू होईल. यात, चेक प्राप्त झाल्यावर केवळ 3 तासांच्या आत त्याची प्राप्तीची पुष्टी द्यावी लागेल. पुष्टी मिळताच लगेचच ग्राहकांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरु होईल.
RBI Cheque New Rule | ग्राहकांना होणारे फायदे :
सध्याच्या व्यवस्थेनुसार, चेक वटवण्यासाठी किमान दोन दिवस थांबावे लागते. पण नव्या नियमामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वेगवान क्लिअरिंगमुळे व्यवहार जलद पूर्ण होतील, विशेषतः मोठ्या रकमेच्या देयकांमध्ये वेळेची बचत होईल.
RBIच्या या पावलामुळे बँकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल. चेक स्वीकारला गेला की नाही हे ठराविक वेळेत स्पष्ट होईल, ज्यामुळे ग्राहकांना अनिश्चिततेत राहावे लागणार नाही. याशिवाय, बँकांना प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याची सक्ती राहील.






