Ravindra Waikar | मुंबई महापालिका निवडणुकीत जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली आहे. खासदार रवींद्र वायकर यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात एकही जागा जिंकता आलेली नाही. एकेकाळी वायकरांचा मजबूत गड मानल्या जाणाऱ्या जोगेश्वरीत आता ठाकरे गटाचे आमदार अनंत (बाळा) नर यांनी जोरदार मुसंडी मारली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सात उमेदवार आणि मनसेचा एक उमेदवार विजयी झाला आहे. (Jogeshwari BMC election results)
या निकालामुळे मुंबईच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली असून, वायकरांच्या प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, वायकर यांना आपल्या कुटुंबातील उमेदवारालाही निवडून आणण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे जोगेश्वरीतील त्यांचं राजकीय वर्चस्व संपल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे.
जोगेश्वरीत अनंत (बाळा) नर यांची ताकद सिद्ध :
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील आठही प्रभागांमध्ये ठाकरे गट आणि मनसेने बाजी मारली आहे. आमदार अनंत (बाळा) नर (Anant Bala Nar victory) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सात नगरसेवक निवडून आले आहेत, तर मनसेचा एक उमेदवारही विजयी झाला आहे. त्यामुळे या भागात शिंदे गटाला खातेही उघडता आलेले नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, हा निकाल केवळ स्थानिक स्तरावरचा पराभव नसून, तो वायकरांच्या राजकीय ताकदीला बसलेला मोठा धक्का आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जोगेश्वरीत वायकर यांचं वर्चस्व राहिलं होतं. मात्र या निवडणुकीत मतदारांनी स्पष्टपणे बदलाचा कौल दिल्याचं चित्र समोर आलं आहे. ठाकरे गटाने स्थानिक मुद्दे, संघटनात्मक ताकद आणि आमदार अनंत नर यांच्या प्रभावी नेतृत्वाचा फायदा घेत हा विजय मिळवला असल्याचं बोललं जात आहे.
Ravindra Waikar | मुंबई महापालिकेत सत्ता कोणाची? :
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेची सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरू असल्याचं चित्र आहे. शहरातील अनेक प्रभागांमध्ये भाजप-शिंदे गट आघाडीवर असून अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर स्पष्ट चित्र समोर येणार आहे. मात्र, जोगेश्वरीतील निकाल हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. (Jogeshwari BMC election results)
या पार्श्वभूमीवर जोगेश्वरीतील बदललेलं राजकीय समीकरण आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं ठरणार असल्याचं निरीक्षकांचं मत आहे. वायकर यांच्यासाठी हा निकाल आत्मपरीक्षणाचा धक्का मानला जात असून, तर अनंत (बाळा) नर यांच्यासाठी हा विजय नेतृत्वाची ताकद सिद्ध करणारा ठरला आहे.






