Ravindra Dhangekar | शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज पुन्हा एकदा भाजप नेत्यांवर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) प्रकरणावरून आधीच भाजप आणि शिंदे गटात तणाव निर्माण झाला असताना, आता धंगेकरांनी थेट मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावरच निशाणा साधला आहे.
“माझ्यावर मोक्का लावण्याची तयारी सुरू” — रवींद्र धंगेकर :
पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत धंगेकर म्हणाले, “मी पुणेकर आहे, सत्य बोलतो आणि माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही. माझ्यावर चंद्रकांत पाटील यांच्या मार्फत मोक्का लावण्याची तयारी सुरू आहे. त्यांचा निकटवर्तीय समीर पाटील (Sameer Patil) हे या कामात पुढाकार घेत आहेत.”
ते पुढे म्हणाले, “समीर पाटील हा पूर्वी आर.आर. पाटलांचे निकटवर्तीय होता. आता तो भाजपमध्ये सक्रिय आहे आणि माझ्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम चालू आहे. पण मी घाबरणार नाही. लोक म्हणतात — ‘हा चुकीचा माणूस आहे, याला सोडू नका.’”
Ravindra Dhangekar | शिंदे यांचा “नो दंगा” संदेश :
या आरोपांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रविवारी पुणे दौऱ्यावर असताना धंगेकरांना स्पष्ट संदेश दिला होता. त्यांनी म्हटलं होतं, “महायुतीत दंगा नको. पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. सर्वसामान्य नागरिक, महिला आणि मुलींना सुरक्षित वातावरण मिळालं पाहिजे.”
शिंदे यांच्या या सल्ल्यानंतर धंगेकर माघार घेणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका अधिक ठामपणे मांडत स्पष्ट केलं की, “मी सत्य बोलतो आणि कुणाच्याही दडपणाखाली जाणार नाही.”
समीर पाटीलकडून अब्रूनुकसानीची नोटीस :
धंगेकरांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना समीर पाटील यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, “मी चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे कामाला नाही. मी भाजपचा कुठलाही पदाधिकारी नाही. रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) माझ्यावर खोटे आरोप करत आहेत. त्यामुळे मी त्यांना कोर्टाद्वारे अब्रूनुकसानीची नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.”
रवींद्र धंगेकरांच्या या गंभीर आरोपांमुळे महायुतीत पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वी नेत्यांमधील हे आरोप-प्रत्यारोप अजून किती वाढतील, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.






