Raosaheb Danve Accident | माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या (Raosaheb Danve) वाहनाला पुण्यातील लोणावळ्यात जोरदार धडक बसल्याची घटना समोर आली आहे. अपघातानंतर दुचाकीस्वाराशी झालेल्या वादामुळे स्थानिक बाजारपेठेतील सीसीटीव्ही यंत्रणेच्या निष्क्रियतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
लोणावळ्यात कारला दुचाकीची धडक
रावसाहेब दानवे काही कामासाठी लोणावळा शहरातील जयचंद चौकात आले असताना त्यांच्या कारला एका दुचाकीने जोरदार धडक दिली. या घटनेनंतर दुचाकीस्वाराने थेट दानवे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. प्रसंग तणावपूर्ण झाला असताना बाजारपेठेतील स्थानिक रिक्षाचालकांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. घटनेच्या वेळी रावसाहेब दानवे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते.
या अपघातामुळे लोणावळा बाजारपेठेतील सार्वजनिक सुरक्षा व्यवस्थेचा फोलपणा उघड झाला. या ठिकाणी पोलीस विभागाचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचे समोर आले असून, केवळ काही दुकानदारांनी स्वतःच्या दुकानांसाठीच कॅमेरे बसवले आहेत. परिणामी, अपघाताची स्पष्ट दृश्ये उपलब्ध होऊ शकली नाहीत.
सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न
घटनेनंतर नागरिकांनी पोलिसांच्या निष्क्रीय सीसीटीव्ही यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली आहे. बाजारपेठेसारख्या गजबजलेल्या ठिकाणी सुरक्षा कॅमेरे बंद असणे गंभीर गोष्ट आहे, असे स्थानिकांनी स्पष्ट केले. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा अभाव आणि त्यावर संबंधित यंत्रणांचा निष्काळजीपणा यामुळे भविष्यात आणखी गंभीर घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नसली तरी, या प्रसंगामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने जागरुकता वाढवण्याची गरज अधोरेखित झाली आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी सीसीटीव्ही व्यवस्थेच्या दुरुस्तीबाबत तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Title : Raosaheb Danve Accident Car Hit by Bike






