Shalini Thackeray | पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने हुंड्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेने राजकीय वातावरण तापले आहे. मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
“२०२५ मध्येही हुंड्याची घृणास्पद प्रथा अजित दादांच्या पक्षातील लोक चालवत आहेत, हे अत्यंत लाजिरवाणे आहे,” असे शालिनी ठाकरे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप
वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) असे मृत महिलेचे नाव असून, हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी तिचा छळ केल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना शालिनी ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “एकीकडे महिलांना लाडकी बहीण म्हणून १५०० रुपये द्यायचे आणि त्यांच्याच पक्षातील नेते हुंड्याची मागणी करतात, हे अत्यंत नीच मानसिकतेचे प्रदर्शन आहे,” असे शालिनी ठाकरे यांनी म्हटले आहे.
शालिनींची तीव्र टीका
शालिनी ठाकरे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवरही टीका केली. “एरवी चित्रपटात एखादा बोल्ड सीन आला की बंदी आणि कारवाईची मागणी करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आता कुठे आहेत? ह्या प्रकरणी महिला आयोगाने तातडीने कारवाई करावी आणि जनजागृती मोहीम राबवावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी शशांक राजेंद्र हगवणे (पती), राजेंद्र तुकाराम हगवणे (सासरे), लता राजेंद्र हगवणे (सासू), करिश्मा राजेंद्र हगवणे (नणंद) आणि सुशील राजेंद्र हगवणे (दीर) यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
Title: “Offering 1500 as ‘Beloved Sister’, Leaders Demanding Dowry”: MNS Attacks NCP






