Rajasthan Jaisalmer Bus Fire | राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यात आज (14 ऑक्टोबर) दुपारी एक भीषण अपघात घडला आहे. 50 हून अधिक प्रवाशांनी भरलेल्या खासगी बसला अचानक आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत 10 ते 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. घटनेनंतर बचावकार्याला वेग देण्यात आला आहे. (Rajasthan Jaisalmer Bus Fire)
अपघात कसा घडला? :
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस जैसलमेरहून जोधपूरच्या दिशेने जात होती. प्रवास सुरू झाल्यानंतर काही अंतरावर बसच्या मागच्या भागातून अचानक धूर निघू लागला आणि क्षणातच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. बसमध्ये एकूण 57 प्रवासी होते, त्यापैकी पुढच्या सीटवर बसलेल्यांनी कसाबसा जीव वाचवला, मात्र मागच्या बाजूच्या प्रवाशांना बाहेर पडण्यास वेळ मिळाला नाही.
सहाय्यक अग्निशमन अधिकारी कृष्णपाल सिंह राठोड यांनी सांगितले की, “आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा बस पूर्णपणे जळालेली होती. स्थानिक लोकांनी काही प्रवाशांना आधीच बाहेर काढलं होतं. मात्र आत अडकलेल्यांना वाचवता आलं नाही.” काही जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, गंभीर जखमींना जोधपूरला हलवण्यात आलं आहे.
Rajasthan Jaisalmer Bus Fire | मुख्यमंत्र्यांची तत्काळ प्रतिक्रिया आणि मदतकार्य :
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली आहे. त्यांनी तातडीने सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि आज रात्री किंवा उद्या सकाळी घटनास्थळी भेट देण्याची शक्यता आहे.
या भीषण आगीत मृत झालेल्यांमध्ये मुले आणि महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असून, काहींना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. बस संपूर्णपणे जळून खाक झाली असून, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेल्पलाइन क्रमांक जारी :
जैसलमेर जिल्हाधिकारी प्रताप सिंह यांनी पीडित प्रवाशांच्या कुटुंबीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
9414801400, 8003101400, 02992-252201, 02992-255055






