Raj Thackeray | राज्य निवडणूक आयोगाने आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करत पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी मतदार यादीतील दुबार नोंदणीबाबत निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना प्रश्न विचारले. मात्र त्यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मनसेप्रमुख राज ठाकरे संतापले आहेत. त्यांनी संबंधित पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ शेअर करत निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे.
राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “ही क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली. आणि आता खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे, हे फक्त संविधानातच! आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुलं बनलं आहे.” ठाकरे म्हणाले, “दुबार मतदार नोंदणी, मतदार यादीतील घोळ आणि प्रशासनातील निष्क्रियता यावर जर आयोगाला उत्तर द्यायची इच्छाच नसेल, तर तुमचा उपयोग काय? महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप नक्की पाहावी; कारण तुमच्या मतदानाचा अपमान कुठून सुरू होतो, हे यातून दिसेल.”
निवडणूक आयोगावर टीकेची झोड :
राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला. त्यांनी पत्रकार परिषदेत कठोर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांचे अभिनंदन करत म्हटले की, “तुमच्या प्रश्नांमुळे आयोगाची भंबेरी उडाली. हीच खरी लोकशाही आहे.” ठाकरे म्हणाले की, “मतदार यादीत सुलभ शौचालयाच्या पत्त्यावर किंवा आयुक्तांच्या बंगल्यावर शेकडो मतदार नोंदवले गेले आहेत, याला जबाबदार कोण?”
निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी यावर उत्तर देताना सांगितले की, “मतदार यादी तयार करण्याची जबाबदारी आमच्याकडे नसते. आम्ही केवळ ती यादी वापरतो आणि त्यातील लहान-सहान दोष दुरुस्त करतो.” मात्र या उत्तरावर राज ठाकरे आणि विरोधक आणखी आक्रमक झाले.
Raj Thackeray | मनसे आणि विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया :
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandip deshpande) म्हणाले की, “आज निवडणूक आयोगाने जो डाव साधला, तो लोकशाहीसाठी धोकादायक आहे. दुबार मतदार आणि बोगस नोंदींचा तपास न केल्यास आम्ही कठोर भूमिका घेऊ.”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली. “आयुक्त म्हणतात की विधानसभेतील दुबार मतदारांवर कमेंट करणार नाही. मग सत्य बाहेर आणणार कोण? तरीही त्यांनी हा विषय मान्य केला, याबद्दल आभार,” असा खोचक टोला पवारांनी लगावला.






