Raj Thackeray | राज्याच्या राजकारणात सध्या मतदार यादीतील घोळावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. 2024 मधील विधानसभा निवडणुकीनंतर अनेक मतदारांच्या नावांमध्ये चूक, पत्त्यांतील तफावत आणि चुकीच्या वयोगटाच्या नोंदी समोर आल्या आहेत. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी मतदार यादीतील त्रुटी दाखवत आयोगाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. (Maharashtra Election Commission controversy)
गेल्या दोन दिवसांपासून विरोधी शिष्टमंडळ आणि राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी यांच्यात दोन फेऱ्यांच्या चर्चाही झाल्या. मात्र, आयोगाच्या भूमिकेवर विरोधक समाधानी नसल्याचं स्पष्ट झालं आहे. राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेवर आसूड ओढत म्हटलं की, “कोणी कोणाला काढलं तेच कळत नाही!” (voter list error Maharashtra)
वयावरून राज ठाकरेंचा जोरदार टोला :
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत मतदार यादीतील विचित्र उदाहरणे वाचून दाखवली. त्यांनी सांगितलं, “चारकोप मतदारसंघात नंदिनी महेंद्र चव्हाण वय १२४ आणि महेंद्र श्रीनाथ चव्हाण वय ४३ अशी नोंद आहे. आता सांगा, कोण कुणाचे वडील आणि कोण कुणाचे मूल?” या उदाहरणावरून ठाकरेंनी आयोगावर नेमकं बोट ठेवलं.
त्यांनी पुढे म्हटलं की, “यादीतील चुका इतक्या गंभीर आहेत की मतदारांचे अधिकार धोक्यात आले आहेत. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने जबाबदारी घ्यावी आणि सुधारणा केल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत.” त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधी पक्षांनीही एकत्र येत आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
Raj Thackeray | मतदार यादीतील घोळ आणि ठाकरेंची मागणी :
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितलं की, 2024 च्या आधी तयार केलेल्या यादीत नाव, पत्ता, फोटो या सर्व बाबतीत प्रचंड गोंधळ आहे. “आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाशी संपर्क साधला तर ते म्हणतात राज्य आयोगाकडे जा, आणि राज्य आयोग म्हणतो की केंद्राकडे जा. मग जबाबदार कोण?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (voter list error Maharashtra)
त्यांनी पुढे मागणी केली की, “याद्या सुधारल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत. काल काढलेलं नोटिफिकेशन रद्द करावं आणि पारदर्शक याद्या तयार करूनच निवडणुका घ्याव्यात.” राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे आता राज्य निवडणूक आयोगावर दबाव वाढला आहे.






