Prakash Ambedkar | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी थेट राज ठाकरेंना जेलमध्ये टाकण्याची मागणी केली आहे. यामुळे राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. राज ठाकरेंना टाडा कायद्या अन्वये अटक करावी, सरकारने तशी हिंमत दाखवावी, असं प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) म्हणाले आहेत.
आज (5 ऑगस्ट) प्रकाश आंबेडकर अमरावती येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करत ही मागणी केली.या मागणीनंतर आता मनसे कार्यकर्ते आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना ‘सुपारीबाज’ असं म्हटलं होतं. त्यानंतर अकोला येथे मनसेच्या काही कार्यकर्त्यांकडून त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी मागणी
अशात प्रकाश आंबेडकर यांनी थेट राज ठाकरेंना जेलमध्ये टाकण्याची मागणी केल्याने वाद वाढण्याची शक्यता आहे. झालं असं की, राज ठाकरे यांनी आरक्षणबाबत मोठं भाष्य केलं होतं. महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरजच नाही. पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे, असं ते म्हणाले होते. यावरच आंबेडकर यांना प्रश्न करण्यात आला.
त्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “राज ठाकरेंसारख्या व्यक्तीवर टाडा लागला पाहिजे. सरकारने मागेपुढे न पाहता त्यांना थेट तुरुंगात टाकून मोकळं झालं पाहिजे. महाराष्ट्रातला माणूस उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये आहे. गुजरातमध्येही मराठी माणसं आहेत त्यांचं काय करायचं? समाज दुभंगण्याची वक्तव्य हे करत आहेत.”, अशी टीका आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांनी केली.
समाज दुभंगला की देश दुभंगतो, असं म्हणत सरकारने हिंमत दाखवून त्यांना अटक करावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. राज ठाकरे यांच्यावर नॅशनल सिक्युरिटी अॅक्ट आणि युएपीएच्या कायद्यान्वये कारवाई झाली पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
आपल्या महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की, आरक्षणाची गरजच नाही. पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या भागात ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स होत आहेत हे का होत आहेत? हे सगळं बाहेरून येणाऱ्यांसाठी होत आहेत. आपल्या ठाणे जिल्ह्यात देशामधला असा एकमेव जिल्हा आहे ज्यात सात ते आठ महानगरपालिका आहेत. एका जिल्ह्यात सात ते आठ महानगर पालिका असतील तर ही लोकसंख्या ठाण्यातील लोकांनी वाढवली का? बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा मोठ्या प्रमाणात आहे, मग त्या शहरांत आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यासाठी सरकारचा पैसा खर्च होतो, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यावरच प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar ) यांनी प्रतिक्रिया दिली.
News Title : raj thackeray should be jailed said prakash ambedkar
महत्वाच्या बातम्या-
रक्षाबंधन बनवा खास; तुमच्या बहिणीला गिफ्ट द्या ‘हे’ स्वस्तात मस्त स्मार्टफोन
रेल्वे विभागात नोकरीची मोठी संधी; तब्बल ‘इतक्या’ पदांसाठी बंपर भरती
12 उपक्रमशील शिक्षकांना विनोबा पुरस्कार प्रदान!
केरळमधील भूस्खलनग्रस्तांसाठी साऊथ अभिनेत्याचा पुढाकार; दिले लाखोंचे योगदान
नागरिकांनो ‘या’ मेसेजपासून सावध राहा; अन्यथा बँक खात होऊ शकत रिकामं






