Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज 12 ऑक्टोबररोजी प्रथमच दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधला. पॉडकास्टद्वारे संवाद साधत राज ठाकरेंनी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काही महत्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी मतदारांना मोठे आवाहन देखील केले आहे. (Raj Thackeray )
राज ठाकरे काय म्हणाले?
“गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याकडे सोनं लुटलं गेलं. पण, आम्ही फक्त आपट्याची पानं एकमेकांना वाटतोय. आपल्याकडे फक्त आपट्याची पानं उरलीयेत, सोनं दुसरेच घेऊन गेलेत. आम्ही कधी आमच्या स्वतःच्या आयुष्यात मश्गूल तर कधी जाती-पातीत मश्गूल. आजचा दसरा निवडणुकीच्या तोंडावर असल्यामुळं खूप महत्त्वाचा आहे. आता बेसावध राहून चालणार नाही. दरवर्षी तुम्ही बेसावध राहता आणि राजकीय पक्ष आपापले खेळ करतात. महाराष्ट्राची प्रगती कुठं चाललीये? जरा बघा. नुसते रस्ते, पुल बांधले म्हणजे प्रगती होत नसते. मोबाइल, कलर टीव्ही हे गॅजेट्स आहेत, ती प्रगती नव्हे. प्रगती मेंदूतून व्हावी लागते. समाजाची प्रगती होणे गरजेचे आहे.”, असं राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray )
“इतके वर्षे राजकारण्यांनी प्रगतीच्या थापा मारूनही तुमच्याकडून राग व्यक्त होताना दिसत नाही. त्याच त्याच लोकांना दरवेळेस निवडून देता. मतदानाचे शस्त्र मतदानाच्या दिवशी न वापरता, या सगळ्या लोकांना शिक्षा न करता शस्त्र ठेवून देता. मग निवडणुका झाल्या की, या लोकांवर बोलत राहता. पण मतदानाच्या दिवशी काय होतं? हा माझ्या जातीचा, हा माझ्या समाजाचा, हा माझ्या ओळखीचा…. असं करून राज्य उभे राहत नाही.”,असंही राज ठाकरे म्हणाले.
“निवडणुकीत बेसावध राहू नका”
“आज मी दसऱ्याच्या निमित्ताने बोलत आहे. 13 तारखेला मनसेचा मेळावा होणार आहे. तेव्हा मी इतर गोष्टींवर बोलणार आहे. आज तुम्हाला संधी प्राप्त झाली आहे. आजपर्यंत तुम्ही ज्यांना जोपासले ते तुमच्याशी प्रतारणा करत आले. तुम्हाला गृहीत धरण्यात आलं. हेच महाराष्ट्राचं नुकसान करत आहे”, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.
यावेळी त्यांनी मतदारांना मोठं आवाहन केलं. निवडणुकीत बेसावध राहू नका. गेली पाच वर्ष तुमच्या मतांशी ज्यांनी प्रतारणा केली, अपमान केला. वेड्यावाकड्या युत्या आणि आघाड्या केल्या. आज संध्याकाळी ते एकमेकांवर बोलतील, पण त्यात तुम्ही कुठे असणार आहात? मी अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न पाहतोय. त्यासाठी माझ्या सहकाऱ्यांना साथ द्या. निवडणुकीत तुम्ही मतदारांनी क्रांती केली पाहिजे, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय. (Raj Thackeray )
News Title – Raj Thackeray Podcast on Dussehra
महत्त्वाच्या बातम्या-
कोकण हार्टेड गर्लचे सूर जुळले; सांगितलं बॉयफ्रेंडच नाव
विखे पाटलांच्या आशीर्वादाने पुण्यातील ‘या’ भागातील दोनशे कोटींची जमीन हडपण्याचा प्रयत्न!
सरसंघचालक मोहन भागवतांचं हिंदूंना मोठं आवाहन; थेट म्हणाले..
दसऱ्याच्या मुहूर्तालाच सोनं महागलं, जाणून घ्या 10 ग्रॅमचे लेटेस्ट दर!






