Raj Kundra | प्रसिद्ध व्यावसायिक व अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांचे पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्यावर ईडीने गंभीर आरोप करत मोठी कारवाई केली आहे. 150.47 कोटी रुपयांच्या तब्बल 285 “बिटकॉइनचे लाभार्थी” (Crypto Currency) मालक असल्याचा दावा ईडीने आपल्या आरोपपत्रात केला आहे.
ईडीच्या आरोपानुसार, राज कुंद्रा यांनी दिवंगत अमित भारद्वाज या कुख्यात फसवणूक करणाऱ्याच्या क्रिप्टो पॉन्झी योजनेतून मिळालेल्या पैशांचे वैध रूपांतर करण्यामध्ये सक्रिय भूमिका बजावली. या प्रकरणात एका विशेष पीएमएलए (PMLA) न्यायालयात दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासे झाले आहेत.
Raj Kundra | माहिती लपवली, पुरावे नष्ट केले
ईडीने सांगितले की, कुंद्रा यांनी फक्त मध्यस्थीचे काम केले नाही, तर बिटकॉइन (Bitcoin) थेट आपल्या ताब्यात ठेवले. हे बिटकॉइन युक्रेनमधील बंद झालेल्या मायनिंग ऑपरेशनसाठी वापरायचे होते. 2018 पासून वारंवार मागणी करूनही त्यांनी बिटकॉइन वॉलेट अॅड्रेसची माहिती दिली नाही. त्यांचा आयफोन एक्स खराब झाला असल्याचे कारण देऊन त्यांनी चौकशीपासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. ईडीने याला “जाणूनबुजून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न” असे म्हटले आहे.
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांनी भारद्वाज आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआर (FIR) मध्ये म्हटले आहे की, गुंतवणूकदारांना व्हेरिएबल प्रायव्हेट टेक लिमिटेडद्वारे मोठ्या परताव्याचे खोटे आमिष दाखवण्यात आले होते. अशा प्रकारे गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली.
पत्नी शिल्पा शेट्टीसोबत व्यवहार
चार्जशीटमध्ये असा आरोप आहे की, राज कुंद्रा यांनी आपल्या पत्नी शिल्पा शेट्टीसोबत आर्थिक व्यवहार करून या पैशांचा स्रोत लपवण्याचा प्रयत्न केला. बाजारभावापेक्षा खूप कमी किमतीत हा व्यवहार करण्यात आला होता, असे ईडीचे म्हणणे आहे. कुंद्रा यांनी जवळपास सात वर्षे बिटकॉइन आपल्या ताब्यात ठेवल्याचे आरोपपत्रात नमूद आहे. पाच हप्त्यांमध्ये हे बिटकॉइन मिळाले होते. ईडीचा ठाम दावा आहे की कुंद्रा हे या बिटकॉइनचे खरे लाभार्थी मालक आहेत.
या प्रकरणातील करार राज कुंद्रा, अमित भारद्वाज आणि त्यांचे वडील महेंद्र भारद्वाज यांच्यात झाल्याचे ईडीने स्पष्ट केले. व्यावसायिक राजेश सतीजा यांचे नावही या आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
News Title:- Raj Kundra’s Dark Dealings Exposed; ₹150 Crore Bitcoin Scam, Shocking Allegations in ED Chargesheet.






