Weather Update | राज्यात पुन्हा एकदा आकाशात ढग दाटले असून पावसाचे संकेत मिळत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उन्हाच्या चटकेनंतर हा पाऊस दिलासा देणारा ठरणार आहे. (Maharashtra Weather Update)
राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण :
पश्चिम-मध्य अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून सुमारे दीड किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय, नैऋत्य बंगालच्या उपसागरातून कोमोरीन भागाकडे चक्राकार वारे सरकण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या प्रणालींमुळे लक्षद्वीप, केरळ आणि दक्षिण कर्नाटक किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा वातावरण पावसासाठी अनुकूल बनले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम सरी बरसतील. नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहनही हवामान विभागाने केले आहे. (Rain Alert)
Weather Update | उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर दिलासा :
राज्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्णतेचा अनुभव घेतला जात होता. रत्नागिरी येथे तब्बल 35.5 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले, तर जळगाव, सोलापूर, ब्रह्मपुरी आणि अमरावती या भागांत तापमान 34 अंशांपेक्षा जास्त होते. या तीव्र उकाड्यानंतर आता ढगांची गर्दी आणि थोड्या सरींमुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)
आज (15 ऑक्टोबर) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड, तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, हवामान खात्याने मान्सूनचा परतीचा प्रवास अंतिम टप्प्यात आल्याचे स्पष्ट केले असून, ऑक्टोबरच्या अखेरीस राज्यभरातून मान्सून माघार घेईल असा अंदाज वर्तवला आहे.






