Railway Ticket Booking | दिवाळीच्या गर्दीत रेल्वे तिकीट मिळवणे मोठे आव्हान असते. अनेकदा आयआरसीटीसी (IRCTC) संकेतस्थळ तांत्रिक अडचणींमुळे बंद पडते, ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. यावर उपाय म्हणून आता पोस्ट ऑफिसमध्येही रेल्वे तिकीट बुक करण्याची (Railway Ticket Booking) सुविधा उपलब्ध होणार आहे, विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोकांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरेल.
देशभरातील ३३३ टपाल कार्यालयात नवी सेवा
केंद्र सरकारने रेल्वे आरक्षण प्रणालीचा विस्तार करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत देशभरातील ३३३ निवडक पोस्ट ऑफिसमध्ये रेल्वे तिकीट बुकिंगची सेवा सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि आयआरसीटीसी (IRCTC) वेबसाईटवरील ताणही हलका होईल.
ही सुविधा विशेषतः त्या ग्रामीण आणि निमशहरी भागांसाठी उपयुक्त ठरणार आहे, जिथे रेल्वे आरक्षण काउंटरची उपलब्धता कमी आहे किंवा नाही. ज्या पोस्ट ऑफिसमध्ये २४ तास सेवा दिली जाते, तिथे ही रेल्वे बुकिंगची सोय देखील चोवीस तास उपलब्ध राहील, ज्यामुळे प्रवाशांना त्यांच्या वेळेनुसार तिकीट काढता येईल.
अशी असेल Railway Ticket Booking प्रक्रिया
पोस्ट ऑफिसमध्ये रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशांना पीआरएस (PRS – Passenger Reservation System) काउंटरवर जाऊन एक विशिष्ट अर्ज भरावा लागेल. या अर्जामध्ये प्रवाशांची नावे, प्रवासाची तारीख, स्थानकांची नावे आणि रेल्वे क्रमांक यासारखी आवश्यक माहिती नमूद करावी लागेल.
अर्ज आणि तिकीटाचे शुल्क जमा केल्यानंतर, पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी त्वरित तिकीट काढून देतील. ही सेवा स्लीपर, एसी आणि जनरल अशा सर्व वर्गांच्या तिकिटांसाठी उपलब्ध असेल. केंद्रीय टपाल विभागाचे निरीक्षक कालूराम पारखी (Kaluram Parkhi) यांनी सांगितले की, ही सेवा तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.






