रायगड जिल्ह्यातील लोकांचा घसा कोरडा!, ४७ गावे आणि ३३ वाड्यांवर मोठं संकट

On: April 12, 2025 8:38 PM
---Advertisement---

अलिबाग: रायगड (Raigad News) जिल्ह्यातील अलिबाग (Alibag) तालुक्यात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्याला पाणीपुरवठा करणारे मुख्य उमटे धरण (Umate Dam, Alibag) गाळाने मोठ्या प्रमाणात भरल्याने त्याची पाणी साठवण क्षमता अत्यंत कमी झाली आहे. धरणात केवळ ८ मीटरपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने, तालुक्यातील ४७ गावे आणि ३३ आदिवासी वाड्यांमधील हजारो नागरिकांसमोर भीषण जलसंकट उभे राहिले आहे. नागरिकांची तहान भागवण्याचे मोठे आव्हान रायगड जिल्हा परिषदेसमोर आहे.

उमटे धरणाची स्थिती नेमकी काय आहे?

रामराज पाटबंधारे योजनेअंतर्गत १९७८ साली बांधलेले हे धरण १९९५ मध्ये रायगड जिल्हा परिषदेकडे (Raigad Zilha Parishad) हस्तांतरित करण्यात आले. मूळ ८७ दशलक्ष घनमीटर क्षमता आणि ५९.४० मीटर उंचीच्या या धरणाचा पाणीसाठा ४७ हेक्टर परिसरात पसरलेला आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे धरण बांधून ४७ वर्षे झाली तरी त्यातील गाळ एकदाही काढण्यात आलेला नाही. त्यामुळे धरणाची मूळ साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात घटली असून, सध्या पाणीसाठा तळाला गेला आहे. यामुळे पाणी उपसा करणे आणि पाणीपुरवठा करणे अधिकाऱ्यांसाठी खूपच कठीण झाले आहे.

धरणातील अत्यल्प पाणीसाठ्यामुळे पाणीपुरवठा अनियमित झाला असून, काही भागांना तर दोन दिवसाआड, तोही नाममात्र पाणी मिळत आहे. यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. पाण्याअभावी नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निहाल चवरकर यांनी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

गाळ काढण्यास मंजुरी, पण कामाला सुरुवात नाही-

धरणाची दुरुस्ती आणि गाळ काढण्यासाठी ११ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून, त्यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे यंदाही पावसाळ्यापूर्वी गाळ काढला जाण्याची शक्यता मावळली आहे. यापूर्वी काही ग्रामस्थांनी सामाजिक संस्थांच्या मदतीने श्रमदानातून थोडा गाळ काढण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामुळे पाणी पावसाळ्यापर्यंत पुरेल अशी आशा निर्माण झाली होती. पण धरणातील पाणीसाठा एप्रिलमध्येच तळ गाठल्याने ती आशाही फोल ठरली आहे.

जोपर्यंत धरणातील गाळ पूर्णपणे काढला जात नाही, तोपर्यंत अलिबाग तालुक्यातील या गावांचा पाणीप्रश्न सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. प्रशासकीय दिरंगाईमुळे मंजूर झालेले काम वेळेत सुरू न झाल्याने हजारो नागरिकांना आणखी काही काळ तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

News Title: Raigad News Alibag Umate Dam Water issue

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now