Pune Rain | गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे शहर आणि ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाने काहीशी उसंत घेतली असली, तरी खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे पुण्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. एकतानगर हा भाग पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्याने, प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले असून, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (NDRF) जवान नागरिकांना बाहेर काढत आहेत. (Pune Rain Rain Update)
एकतानगरला पुन्हा एकदा पुराचा फटका बसला :
पुणे शहर आणि परिसरातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांतील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. यातील पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांतून सोडले गेलेले पाणी खडकवासला धरणात जमा होत असल्याने, खडकवासला धरणातून (Khadakwasla dam) मुठा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे. आज सकाळी नऊ वाजल्यापासून ३९,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, ज्यामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे.
या वाढलेल्या विसर्गामुळे नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. पुण्यातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याचे वृत्त आहे. यामध्ये एकतानगरला पुन्हा एकदा पुराचा फटका बसला आहे. येथील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची मोहीम सुरू आहे. बचाव पथके आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, ते तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवत आहेत.
पुण्यासाठी रेड अलर्ट जारी :
हवामान विभागाने यापूर्वीच पुण्यासाठी रेड अलर्ट जारी केला होता, त्यामुळे प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. मात्र, तरीही पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, त्यांनी सुरक्षित ठिकाणी जावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Pune Rain Rain Update)
पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आगामी काळातही पाऊस सुरू राहण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने सतर्क राहण्याचे आणि नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.






