Pune Flyover | वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेला पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल आता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला असून, त्यामुळे रोजच्या कोंडीतून सुटका होऊन नागरिकांचा मौल्यवान वेळ वाचणार आहे.
प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी :
आतापर्यंत राजाराम पूल ते फन टाईम थिएटर या अवघ्या २.६ किमी अंतरावरील सहा चौक पार करण्यासाठी तब्बल अर्धा तास लागत होता. मात्र, नव्या उड्डाणपुलामुळे हेच अंतर आता फक्त ५ ते ६ मिनिटांत पार करता येणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन वाचणार असून, दररोज लाखो नागरिकांना याचा थेट फायदा होणार आहे.
Pune Flyover | तीन टप्प्यांत पूर्ण झालेला प्रकल्प :
पहिला टप्पा: राजाराम पूल चौकाजवळ ५२० मीटर लांबीचा उड्डाणपूल (खर्च – १५ कोटी रुपये)
दुसरा टप्पा: विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटरदरम्यान २.१ किमी लांबीचा पूल (खर्च – ६१ कोटी रुपये)
तिसरा टप्पा: वीर शिवाजी काशीद चौक ते कै. प्रकाश विठ्ठल इनामदार चौकदरम्यान १.५ किमी लांबीचा पूल (खर्च – ४२ कोटी रुपये)
एकूण या प्रकल्पावर ११८.३७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
वाहतुकीसाठी अत्यावश्यक प्रकल्प :
सिंहगड रस्त्याच्या एका बाजूला मुठा नदी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर असल्यामुळे पर्यायी रस्त्याची सोय करणे अशक्य होते. दररोज सुमारे दीड लाखांहून अधिक वाहनांची ये-जा या मार्गावर होत असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली होती. यावर तोडगा म्हणून पुणे महानगरपालिकेने उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २१ सप्टेंबर २०२१ रोजी झाले होते.
या उड्डाणपुलामुळे धायरी, नऱ्हे, खडकवासला, वडगाव बुद्रुक, नांदेड सिटी आणि मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे पुणेकरांना आता कोंडीमुक्त प्रवासाची नवी सुविधा मिळाली असून, शहरातील वाहतुकीच्या व्यवस्थापनात हा पूल ऐतिहासिक ठरणार आहे.






