उद्या १९ फेब्रुवारीला पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर

On: February 18, 2026 12:33 PM
Pune Traffic Change
---Advertisement---

Pune Traffic Diversion | छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गुरुवारी पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मध्यवर्ती भागात गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. काही प्रमुख रस्त्यांवर तात्पुरते निर्बंध लावण्यात आले असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Pune Traffic Diversion)

मुख्य रस्त्यांवर निर्बंध लागू :

दरवर्षी उत्साहात साजरी होणारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती यंदाही जल्लोषात पार पडणार आहे. शहरातील प्रमुख भागांतून मिरवणुका निघणार असल्याने वाहतुकीवर ताण येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्ता या मार्गांवरील वाहतूक तात्पुरती वळवण्यात आली आहे. या परिसरात जड वाहनांना पूर्णतः मनाई करण्यात आली आहे.

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव (Himmat Jadhav) यांनी नागरिकांनी शक्यतो खाजगी वाहनांचा वापर टाळावा, असे आवाहन केले आहे. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळपर्यंत, गर्दी ओसरत नाही तोपर्यंत हे बदल कायम राहतील. त्यामुळे शहरातील नागरिकांनी प्रवासाचे नियोजन आधीच करून ठेवावे, असे सूचित करण्यात आले आहे.

Pune Traffic Diversion | पर्यायी मार्गांची व्यवस्था :

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी विविध पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. शिवाजी महाराज रस्त्यावर जिजामाता चौकातून जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक मार्गे जंगली महाराज रस्ता, खंडोजीबाबा चौक आणि टिळक रस्ता वापरावा. गणेश रस्त्यावर दारूवाला पुलाकडून फडके हौद चौकाकडे जाणारी वाहतूक दारूवाला पूल चौकातूनच परत वळवली जाईल.

बाजीराव रस्त्यावरून पूरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्यांनी टिळक रस्ता, अलका टॉकीज चौक आणि फर्ग्युसन रस्ता या मार्गाने प्रवास करावा. केळकर रस्त्यावर मिरवणूक संपेपर्यंत अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील; वाहनचालकांनी केळकर रस्त्याने पुढे जावे. लक्ष्मी रस्त्यावर सोन्या मारुती चौकात मिरवणूक सुरू असताना वाहतूक संत कबीर चौकातून वळवण्यात येईल. (Pune Traffic Diversion News)

आपत्कालीन सेवांना मात्र या बदलांतून सूट देण्यात आली आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर तातडीच्या सेवांच्या वाहनांना प्राधान्याने मार्ग दिला जाणार आहे. प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे तसेच नियोजनपूर्वक प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

News title : Pune Traffic Diversions for Shiv Jayanti

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now