Pune New Express Highway | खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जळगाव, धुळे, नंदुरबारसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून शिक्षण, नोकरी, उद्योगधंदे आणि व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर लोक पुण्याला ये-जा करतात. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि आयटी हब म्हणून ओळखले जाते. त्यामुळे जळगाव, छत्रपती संभाजीनगर (Chatrpati sambhajinagar) आणि आसपासच्या जिल्ह्यांमधून दररोज हजारो प्रवासी पुण्याकडे प्रवास करत असतात.
या प्रवाशांसाठी आता सरकारकडून मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान नवीन एक्सप्रेस हायवे तयार करण्यात येणार असून, या महामार्गामुळे भविष्यात जळगाव ते पुणे प्रवास अवघ्या 3 तासांत पूर्ण होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
पुणे–छत्रपती संभाजीनगर प्रवास होणार अधिक वेगवान :
सध्या पुण्याहून छत्रपती संभाजीनगरकडे रस्तेमार्गे प्रवास करायचा असल्यास साधारणपणे 6 ते साडे 6 तासांचा वेळ लागतो. रस्त्यांची अवस्था, वाहतूक कोंडी आणि वळणावळणाचा मार्ग यामुळे प्रवास अधिकच त्रासदायक ठरतो. मात्र, नवीन एक्सप्रेस हायवे पूर्ण झाल्यानंतर पुणे ते छत्रपती संभाजीनगरचा प्रवास फक्त 2 तासांत पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे.
या महामार्गाची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः केली असून, हा प्रकल्प राज्याच्या दळणवळण व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवणार असल्याचे मानले जात आहे.
Pune New Express Highway | जळगाव–समृद्धी महामार्ग कनेक्शनमुळे मोठा फायदा :
जळगाव ते पुणे प्रवास (Jalgaon Pune Highway) जलद होण्यामागे समृद्धी महामार्गाची महत्त्वाची भूमिका असणार आहे. मुंबई–नागपूर समृद्धी महामार्गाला जळगाव जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जून महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता.
सध्या जळगावहून छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी अजिंठा–सिल्लोड मार्ग वापरावा लागतो आणि यासाठी 2 ते अडीच तासांचा वेळ जातो. मात्र, सरकारकडून जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास फक्त 1 तासावर आणण्यासाठी नवीन रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हा रस्ता थेट छत्रपती संभाजीनगर येथे समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे.
असा असेल भविष्यातील रूट :
जळगाव ते छत्रपती संभाजीनगर : सुमारे 1 तास
छत्रपती संभाजीनगर ते पुणे : सुमारे 2 तास
अशा प्रकारे एकूण 3 तासांत जळगाव ते पुणे प्रवास करता येणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
प्रकल्पासाठी 16,320 कोटींचा खर्च :
पुणे–छत्रपती संभाजीनगर (Pune- Sambhajinagar) एक्सप्रेस हायवे प्रकल्पासाठी अंदाजे 16,320 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर केवळ प्रवासाचा वेळच कमी होणार नाही, तर उत्तर महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाड्याच्या आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.
एकूणच, हा नवीन एक्सप्रेस हायवे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे यांच्यातील अंतर केवळ किलोमीटरमध्येच नव्हे, तर वेळेच्या बाबतीतही मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.






