Pune Double Decker Bridge | पुणेकरांसाठी वाहतुकीच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे. पुणे शहराला लवकरच तिसरा डबलडेकर उड्डाणपूल मिळणार आहे. हा नवा उड्डाणपूल पुणे मेट्रो फेज-2 चा महत्त्वाचा भाग असून, तो कोथरुड डेपो येथे उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे कोथरुड, पौड रोड आणि चांदनी चौक परिसरातील वाढत्या वाहतूककोंडीवर नियंत्रण मिळवता येणार आहे. (Pune Double Decker Bridge)
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) तर्फे या पुलाची उभारणी केली जाणार आहे. यातील विशेष बाब म्हणजे या प्रकल्पासाठी कोणतेही भूसंपादन करावे लागणार नाही, त्यामुळे बांधकामाला गती मिळेल आणि वाहतुकीलाही मोठा अडथळा येणार नाही.
कोथरुड डेपो ते चांदनी चौक; वाहतुकीला मिळणार दिलासा :
महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक आणि नळ स्टॉप (Nal stop) येथे डबलडेकर उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. या दोन्ही ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात होती. मात्र, या पुलांमुळे वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाली आहे.
आता कोथरुड डेपो परिसरातील नव्या पुलामुळे वानवडी (Wanvadi) ते चांदनी चौक या मार्गावरील प्रवास अधिक सुकर होणार आहे. या पुलाच्या डिझाइनमध्ये आधीच्या दोन्ही डबलडेकर प्रकल्पांचा यशस्वी अनुभव वापरला जाणार आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी आणि मेट्रोसाठी एकाच वेळी उपयुक्त ठरेल.
Pune Double Decker Bridge | भूसंपादनाशिवाय जलदगतीने काम पूर्ण होणार :
महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी सांगितले की, “नळ स्टॉप पुलासाठी भूसंपादन करण्यात आलं होतं. पण कोथरुड डेपो प्रकल्पात तशी गरज नाही. या परिसरात रस्त्याची पुरेशी रुंदी आहे, त्यामुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय बांधकाम शक्य आहे.” (Pune Double Decker Bridge)
या प्रकल्पात सुमारे 1.123 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड मेट्रो व्हायाडक्ट बांधला जाणार आहे. तसेच कोथरुड बस डेपो आणि चांदनी चौक येथे दोन नवीन मेट्रो स्टेशन तयार केली जातील. सध्या 700 मीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
सुरुवातीला महामेट्रो या प्रकल्पासाठी निधी पुरवणार असून, आवश्यकता भासल्यास पुणे महानगरपालिकेकडून (Pune Mahanagarpalika) आर्थिक मदत घेण्यात येईल, अशी माहिती गाडगीळ यांनी दिली. या नव्या पुलामुळे कोथरुड आणि चांदनी चौक परिसरातील नागरिकांना दैनंदिन प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे.






